पनवेल – कामोठे येथील मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात मंगळवारी सकाळी पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष छाटणीतून पडलेल्या कचऱ्याला अचानक आग लागून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे मोठे लोट परिसरात पसरू लागले.
आगीची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक विकास घरत यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर पनवेल महापालिकेच्या दोन अग्निशमन गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले; मात्र झुडपे, सुक्या फांद्या व अन्य कचऱ्यामुळे आगेत जलद वाढ झाली. पहिल्या गाडीतील पाणी अवघ्या २० मिनिटांत संपल्याने दुसऱ्या गाडीच्या मदतीने संयुक्तरीत्या प्रयत्न करून अखेर आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत दोन झाडांना झळ पोहोचल्याचे समजते.
माजी नगरसेवक घरत यांनी पालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले, “मोकळ्या मैदानात नियमितपणे कचरा आणि वृक्षछाटणीचा माल टाकला जातो. त्यातूनच अशा दुर्घटना घडत आहेत. जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
एकीकडे महापालिकेचा स्वच्छता विभाग डीप क्लिनींगसारखे अभियान घेऊन अनेक वर्षे किंवा महिन्यांपासून साचलेला कच-याचा तो परिसर स्वच्छ करते आणि दूस-या ठिकाणी वृक्ष छाटणीचा कचरा त्याच जाग्यावरच पडून स्वच्छ परिसर अस्वच्छ करून पुन्हा डीप क्लिनींग करण्याची स्थिती निर्माण केली जाते. वृक्ष प्राधिकरण, स्वच्छता आणि वाहन विभाग यांच्यामधील असमन्वयातून अशी घटना घडत असल्याने पालिकेत संयुक्त कामगिरीचा अभाव या घटनेतून दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या घटनेची चौकशी करून संबंधित कारणेभूत अधिकारी व कर्मचा-यांची चौकशी करण्यात येईल.- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापलिका
