पनवेल – पनवेलमध्ये आगीचे सत्र सुरूच आहे. बुधवारी दुपारच्या सूमारास खारघर येथील रवेची हाईट्स या इमारतीमधील एका सदनिकेला आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जिवित हाणी झाली नसून वेळीच अग्निशमन दल तेथे पोहचून आगीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळवले.
खारघर उपनगरामधील पोलीस ठाण्याच्या परिसरातील सेक्टर ७ येथील भूखंड क्रमांक २५ वरील रवेची हाईट्स या इमारतीमधील तीस-या मजल्यावर सदनिकेत लागलेल्या आगीत कोणतीही जिवीत हाणी झाली नसल्याचे खारघर पोलिसांनी स्पष्ट केले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहर या अग्निशमन केंद्रात गेल्या ११ महिन्यात ३३५ आगीच्या घटनांची नोंद झाली. तर खारघर उपनगरातील सिडकोच्या अखत्यारीत येत असलेल्या खारघर येथील अग्निशमन दलाच्या केंद्रात १६० आगीच्या घटनांची नोंद झाली. खारघरमधून ४३ जणांचे प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या अकरा महिन्यात ४९५ आगीच्या घटना घडल्या आहेत.
वारंवार लागलेल्या आगीच्या घटनांमुळे पनवेलमध्ये अपघात सत्र सुरूच आहे. आगीच्या घटना कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे.
