तुर्भेतील कारच्या सव्‍‌र्हिस सेंटरला आग; अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा असतानाही गैरहाताळणीमुळे मोठे नुकसान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील महागडय़ा कारच्या सव्‍‌र्हिस सेंटरला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत बीएमडब्ल्यू, रोल्स रॉइस यासारख्या २५हून अधिक आलिशान कार भस्मसात झाल्या. कोटय़वधी रुपयांच्या किमतीच्या कारचे देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या या सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये अग्निशमनासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, तिच्या चुकीच्या हाताळणीमुळे आगीवर वेळीच नियंत्रण आणता आले नाही व कोटय़वधीचे नुकसान झाले.

 तुर्भे एमआयडीसीतील डी ब्लॉक भूखंड क्रमांक डी २०/७ या ठिकाणी इन्फिनिटी हे बीएमडब्ल्यू या कार कंपनीचे अधिकृत सव्‍‌र्हिस सेंटर आहे. मात्र, याठिकाणी अन्य महागडय़ा परदेशी गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही केले जाते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास या इमारतीला आग लागल्याची वर्दी तुर्भे एमआयडीसी अग्निशमन दलास मिळाली. मात्र, अग्निशमन दलाची तुकडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यास दलाला चार तास अथक प्रयत्न करावे लागले.

आग लागली तेव्हा या इमारतीत जवळपास ४५ महागडय़ा कार होत्या. त्यापैकी तळमजल्यावरील शोरूम आणि पहिल्या मजल्यावरील २५ बीएमडब्ल्यू कार आगीत पूर्णपणे भस्मसात झाल्या. तसेच कूपर कंपनीची एक कार आणि अन्य एका कारचेही पूर्ण नुकसान झाले. शोरूमखालील तळघरात सुमारे १८ कार होत्या. मात्र, त्यांना आगीची झळ बसली नाही. वरच्या मजल्यावरील कारचे सुटे भाग आणि साहित्य यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.  आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन अधिकारी सुरेश गोल्हार यांनी सांगितले.

अग्निशमन व्यवस्था असूनही त्रुटी

या महागडय़ा शोरूममध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली होती. ही यंत्रणा स्वयंचलित आणि मानवी पद्धतीने (मॅन्युअल मोड) कार्यान्वित करण्यात येते. मात्र, ज्यावेळी आग लागली तेव्हा ही यंत्रणा  मॅन्युअल मोडमध्ये असल्याने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. तसेच पाणी फवारा करण्यासाठी लागणाऱ्या विद्युत जनित्राची बॅटरीही संपली होती, असे तुर्भे अग्निशमन दलाच्या पाहणीत समोर आले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire expensive cars burnt ysh
First published on: 09-12-2021 at 00:52 IST