उरण : वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे येथील करंजा आणि मोरा यासह अनेक बंदरातील मासेमारीसाठी रवाना झालेल्या शेकडो मासेमारी बोटी कोकण किनारपट्टीवरील अनेक बंदरात अडकल्या आहेत. या बदललेल्या परिस्थितीमुळे मासेमारी साठी करण्यात आलेला ३ ते ४ लाखांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे सरकारने मच्छिमारांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. गेल्या शनिवार पासून दोन दिवसांत २५० मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांत वातावरणात बदल होण्याची वाट पाहत बसले आहेत. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

१ ऑगस्टला जून व जुलै या दोन महिन्यांच्या खोल समुद्रातील मासेमारी वरील बंदी उठल्यावर दोन महिन्यांनी हंगामसुरू झाला आहे.खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. मात्र दोन तीन दिवसांपासून वादळी पाऊस व खराब वातावरणामुळे मच्छीमारांना मिळालेल्या आदेशानुसार येत्या २२ ऑगस्टपर्यंत वादळी पाऊस व खराब हवामानाची स्थिती अशीच राहणार आहे. त्यामुळे २२ ऑगस्टपर्यंत खोल समुद्रातील आणि पर्सियन मासेमारी बंद ठेवावी लागणार असल्याची माहिती वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट असोसिएशन संचालक रमेश नाखवा यांनी दिली आहे.

शेकडो मासेमारी बोटी शुक्रवारपासूनच माघारी येण्यास सुरुवात झाली. २५० मच्छीमार बोटींनी जयगड, दाभोळ, रत्नागिरी, रायगडमधील अलिबाग, रेवदंडा आदी बंदरांचा आश्रय घेतला.

एका फेरीसाठी ४ लाखांचा खर्च : मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या एका बोटीसाठी किमान ४ लाख रुपये खर्च येतो. यात सर्वात अधिक खर्च हा डिझेलचा असतो. त्याचप्रमाणे बर्फाचेही दर वाढले आहेत.

निम्मा निम्मा नफा : बोट मालक आणि बोटीवर काम करणारे खलाशी व चालक तांडेल यांच्यात खर्च जाऊन मिळणाऱ्या नफ्याचा निम्मा निम्मा वाटा हा समान वाटण्यात येतो. एका फेरीसाठी किमान चार ते पाच दिवस लागतात.

नुकसानभरपाई देण्याची मागणी : अनेक संकटांचा सामना करीत मासेमारी करावी लागत आहे. त्यातच दोन महिन्यांनी पुन्हा एकदा मासेमारी सुरू झाली आहे. मात्र सुरुवातीलाच नुकसान सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी करंजा येथील मच्छिमार नित्यानंद कोळी यांनी दिली आहे.