नवी मुंबई : हार्बर मार्गावरील वाशी–पनवेल स्थानकांदरम्यान येत्या रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ०४.०५ वाजेपर्यंत पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे देखभाल व तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेतला जात आहे.
या ब्लॉकदरम्यान पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या (१०.३३ ते १७.०७) आणि सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल (०९.४५ ते १५.४४) या वेळेत पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, कळंबोली व पनवेल स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
तथापि, प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–वाशीदरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाशीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर देखील ब्लॉकचा परिणाम जाणवणार आहे. पनवेल–ठाणे मार्गावरील (११.०२ ते १६.२६) आणि ठाणे–पनवेल मार्गावरील (१०.०१ ते १६.२४) ट्रान्सहार्बर सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त ठाणे–वाशीदरम्यानची सेवा ११.०५ ते १६.०५ दरम्यान सुरू राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सोशल मीडिया हँडल्स (@drmmumbaicr, @mumbaidivisioncr), मोबाईल अॅप्स आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून अपडेट तपासण्याचे आवाहन केले आहे.
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी प्रवासी संख्या वाढलेली असते. त्यामुळे रेल्वेने वेळेचे योग्य नियोजन करून प्रवास करावा, तसेच विशेष लोकल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
ब्लॉकदरम्यान सुरू राहणाऱ्या तांत्रिक कामांची पूर्णता ही रेल्वेच्या सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांनी यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.