पनवेल – मुंबईतील शीव (सायन) येथून वर्षासहलीसाठी खारघर येथील डोंगररांगांमध्ये फीरण्यासाठी आलेले पाच तरुण सोमवारी दुपारी डोंगरावरील धबधब्यातील पाण्यात अचानक वाढ झाल्याने धबधब्यावरच अडकून पडले. खारघर येथील अग्निशमन दलाचे जवान आणि खारघर पोलिसांचे पथकाने या तरुणांना दोरीच्या साह्याने सूखरुप धबधबा ओलांडून बाहेर काढले.

खारघर उपनगरातील गोल्फकोर्सच्या मागील ड्राईव्हींग रेंजच्या येथून पांडवकड्यावर जाण्यासाठी पायवाटेचा मार्ग आहे. नवी मुंबईचे पोलीस दरवर्षी पावसाळ्यात पांडवकड्यावरील धबधब्यावर जाण्यास मनाई आदेश काढतात. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला हे आदेश नागरिकांसाठी जाहीर केले जातात. मात्र मे महिना सुरू असल्याने यंदा पोलिसांनी मनाई आदेश काढले नव्हते. याचा फायदा घेऊन सोमवारी हे पाच तरुण पांडवकड्यावर वर्षासहलीसाठी डोंगरावर गेले होते.

मुसळधार पावसामुळे खारघर डोंगरातून निघणाऱ्या धबधब्याचे पाणी अचानक वाढल्याने या तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्याच पाण्याचा प्रवाह ओलांडणे त्यांना शक्य नसल्याने तरुण तेथे अडकून राहिले. खारघरच्या अग्निशमन केंद्राला संपर्क साधल्यावर तेथील जवानांनी डोंगरावरील धबधब्यापर्यंत चढून दोरीच्या साह्याने पाच तरूणांना सुखरूप डोंगराखाली आणले. या मुलांना सूखरुप डोंगररांगातून बाहेर आणल्यावर खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी त्यांचे समुपदेशन केले. ही मुले ११ व १२ वीत शिकणारी आहेत. या मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. रात्री या मुलांना पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे खारघर पोलिसांनी सांगितले.

दुपारी सव्वा दोन वाजता मुले अडकल्याची खबर मिळताच अवघ्या सात मिनिटांत खारघरमधील ड्रायव्हिंग रेंजच्या पाठीमागील डोंगरावर साधारण ग्राऊंड लेवलपासून ६५० मीटर आत मध्ये धबधबाच्या खाली मुलांपर्यंत आमचे पथक पोहचले. घटनास्थळी जाऊन रस्सीच्या साहाय्याने मुलांना धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला सुखरूप खाली आणून सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदिप आव्हाड यांच्या ताब्यात दिले. पावणेचार वाजता बचावकार्य पूर्ण झाले. – प्रविण बोडखे, अग्निशमन अधिकारी, सिडको

मुलांची नावे

महेश शिरगड, २२

राकेश वेलमुर्गन १८

प्रतिक जोगु १८

रमेश चिंगमेटे १९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहील शेख २१