नवी मुंबई: वाशी पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश मधून अटक केले आहे. आरोपीत एका महिलेचाही समावेश आहे. अटक आरोपींकडून १३ गुन्ह्यांची उकल झाली असून ३० लाख १७ हजरांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आशीष उर्फ सुरज जिलेदार सिंग, राजकुमार लालबहादुर सिंग ठाकुर, राजकुमार रामकुमार पांचाळ, पुजा अंकुश जाधव, अशी अटक आरोपींची नावे आहेत. यात एनान अब्दुल करीम चौधरी, आनंद राजु पिल्ले उर्फ रजवा यांचेसह या अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. वाशी सेक्टर ०६ मधील एका रो हाऊस मध्ये घरात कोणी नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने रो हाउसचे ग्रिल तोडून घरातील सोने, हिरे, व इतर मौल्यवान व रोख रक्कम असा एकूण नव्यान्नव लाख पंच्यान्नव हजार रुपयांचा माल घरफोडी चोरी करून नेला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे सहाय्यक आयुक्त डी डी . टेळे यांच्या मार्गदर्शखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले होते.
आणखी वाचा- नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप मोठ्या उत्साहात संपन्न
यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार श्रीकांत सावंत, विनोद वारींगे, सुनिल चिकणे, पोलीस नाईक चंदन म्हसकर, संदीप पाटील, गोकुळ ठाकरे, अमोल राठोड, पोलीस शिपाई किशोर डगळे, अमित खाडे यांचा समावेश होता. सदर पथकाने गुन्हयावरून आरोपीचा शोध काम चालू असताना घटनास्थळावरील मिळालेल्या पुराव्याचे आधारे व सी.सी. टि.व्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासावरून वाशी पोलीस ठाणेच्या पोलीस पथकाने अभिलेखावरील आरोपींचा शोध घेतला. तांत्रिक तपासात काही माहिती समोर आल्यावर आरोपींच्या शोधासाठी या पथकाची ३ वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा माग काढला. आरोपींवर पाळत ठेवत त्यांना उत्तप्रदेश व मध्यप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींना अटक केल्यावर त्यांच्या चौकशीतून एनान अब्दुल करीम चौधरी, आनंद राजु पिल्ले उर्फ रजवा यांचाही गुन्ह्यातील सहभाग समोर आला आहे. सदर आरोपींचा शोध सुरु आहे. अटक आरोपींकडून एकुण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपी व त्यांचे साथीदारांनी आजपावेतो पन्नासपेक्षा जास्त घरफोड्या केल्या आहेत. सदर आरोपींविरुध्द ठाणे, मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर तसेच गुजरात, राजस्थान या राज्यात देखील गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले. सदर अटक आरोपींनी त्यांचे साथीदार एनान अब्दुल करीम चौधरी, आनंद राजु पिल्ले उर्फ रजवा यांच्यासह चारचाकी गाडीतून येवून घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हयातील चोरलेल्या मालमत्तेपैकी १३ लाख ५० हजार ५०० रुपये रोख रक्कम, ८ लाख रूपयांचे अमेरीकन डॉलर्स, १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असे एकुण २२ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलीस ठाण्यास दाखल ८ गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये ७ लाख ५२हजार रूपये किंमतीची मालमत्ता अशाप्रकारे एकूण ९ गुन्हयात मिळून ३० लाख १७हजार किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.