नवी मुंबई : माझ्याकडे हरीण आणि बिबट्याची पिले होती. पण मी वनमंत्री झाल्यावर त्या पिलांना मला सोडून द्यावे लागले, असे वक्तव्य गणेश नाईक यांनी नवीमुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केले. नवी मुंबई वाशी येथे एका संस्थेच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात वनमंत्री गणेश नाईक  हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सर्वांसमोर उलगडली. त्यांची ही आठवण ऐकून उपस्थितांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. ‘काही वर्षांपूर्वी माझ्यासाठी एकजण हरिण घेऊन आले होते. त्यावेळी मी त्या हरीणला सांभाळले होते. परंतू, ज्यावेळी मी वनमंत्री झालो तेव्हा मी त्याला सोडून दिले.

कारण, वनमंत्री झाल्यानंतर जंगलातले प्राणी पाळणे जसे की, मोर पाळणे किंवा इतर प्राणी पाळणे शक्य नाही. असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मी बिबट्याची पिल्ले सुद्धा पाळली होती. परंतू, या प्राण्यांना कोण सांभाळणार. आपण प्रेमाने सांभाळू परंतू, कायद्यानुसार जंगलातले प्राणी पाळणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कायद्यासमोर प्राण्यांबद्दलच्या प्रेमाला पूर्णविराम द्यावा लागतो, अशी भावना गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केली.