Ganesh Naik /Eknath Shinde नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर राहणार. युती झाली तरी भाजपाचा महापौर, नाही झाली तरी भाजपचाच महापौर राहणार असे सूचक वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. नवी मुंबईतील जनतेला किंवा महाराष्ट्रातील जनतेला नवी मुंबई कोणाची आहे, हे सांगायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

नवी मुंबईतील विविध प्रश्नांवर गणेश नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शिंदे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.मध्यंतरी तर गणेश नाईक यांनी ठाण्यात भाजपाची सत्ता आणायची असेल तर अहंकारी रावणाचे दहन करावं लागेल असं वक्तव्य केले. दहा तोंडाच्या रावणाची उपमा त्यांनी कोणाला दिली अशी चर्चा या निमित्ताने रंगली होती. गणेश नाईक यांच्या या टीकेनंतर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील जोरदार आक्रमक झाली असून ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनीही गणेश नाईक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईतील शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात शिवसेनेचे उदय सामंत यांनी आम्ही दुसऱ्याच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, पण दादागिरी करुन आमच्या खात्यामध्ये जर कोण हस्तक्षेप करत असेल तर, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. पुढे ते म्हणाले होते, नवी मुंबईत खऱ्या अर्थाने लोकांना जीवदान देण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा विश्वास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, दुसऱ्या कोणावर नाही,” अशी टीका सामंत यांनी केली होती. जर तुम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलात, तर आपला भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकवू शकतो, असे आवाहन देखील त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले.

गणेश नाईक यांनी नुकतेच नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर राहणार. युती झाली तरी भाजपाचा महापौर, नाही झाली तरी भाजपचाच महापौर राहणार असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटून उठल्याचे दिसत आहे. युती व्हावी अशी जर वरिष्ठ नेत्यांची इच्छा असेल तर, भाजपच्या कतृत्वान कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर, ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील. परंतू, कार्यकर्त्यांचा सन्मान नाही झाला तर, युती होऊ नये यासाठी मीच आग्रही असेल, असे मत गणेश नाईक यांनी मांडले. निवडणूका लागल्या की, अष्टविनायक यात्रा, फार्महाऊस वर पार्ट्या सुरु होतील. आणि गरिबांना दोन हजार ,पाच हजार रुपये देतील. परंतू या गरिबांची वाट लावतील भोळेभाबडे लोक याला बळी पडतील. परंतू, आजवर नवी मुंबईच्या जनतेने हे कधी स्विकारले नाही कारण, नवी मुंबईची जनता जागृक आहे. नवी मुंबईची जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.