नवी मुंबई : मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण व्हावे यासाठी ‘सिडको’सह शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. ॲाक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या विमानतळाचे उद्घाटन करायचे आणि विमानतळाचा ताबा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) सोपवायचा अशी आखणी करण्यात आली आहे. दरम्यान, डिसेंबरमध्ये पहिले उड्डाण होऊ शकेल, अशी शक्यता ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा भेट दिली होती. तेव्हा विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले होते. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी ‘अदानी उद्योग समुहा’ला दिल्या होत्या. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाचा रितसर ताबा ‘डीजीसीए’कडे सोपवावा लागणार आहे. ताबा मिळाल्यानंतर विमानाचे प्रत्यक्ष उड्डाण होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे ‘डीजीसीए’ने ‘सिडको’ला कळविले आहे. त्यादृष्टीने आता आखणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
नवी मुंबई विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता तब्बल ९ कोटी इतकी असणार आहे. तसेच हरित उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी या विमानतळामध्ये सौरऊर्जेतून निर्माण केलेल्या ३७ मेगावॅट ऊर्जेचा वापर करण्याचे नियोजन आहे. अंतर्गत वाहतुकीसाठी वीज व गॅस या इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याची योजना आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा उपलब्ध राहील, ज्यामुळे बॅगेज शहरात जमा करून प्रवासी बिनबोभाट विमानतळापर्यंत पोहोचू शकतील.
दोन महिने आधीच ताबा देण्याची कार्यवाही
– राज्यात आणि विशेषत: ‘एमएमआर’मधील महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला घेण्याचे बेत आखले जात आहेत. वेगवेगळ्या शहरांमधील प्रभागांची प्रारुप रचना पूर्ण झाली असून त्यासंबंधीचा पहिला आराखडा लवकरच जाहीर होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक राज्यातील महायुती सरकारसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
– यापूर्वी नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण व्हावे, अशी आखणी केली जात असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबरच्या मध्यावर या विमानतळावरून पहिले उड्डाण व्हावे, अशा सूचना ‘सिडको’ला देण्यात आल्या असून त्यासाठी दोन महिने पूर्वीच ‘डीजीसीए’ला विमानतळाचा ताबा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
पायाभूत सुविधांचा फेरआढावा
नवी मुंबई हे देशातील अत्याधुनिक पायाभूत सुविधा असणारे विमानतळ असणार आहे. दोन धावपट्ट्या, अत्याधुनिक टर्मिनल, जगातील सर्वात जलद ‘बॅगेज क्लेम’ व्यवस्था अशी अनेक वैशिष्ट्ये या विमानतळामध्ये असतील. पहिल्या धावपट्टीवरील आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या असून टर्मिनल इमारतीचे सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पावर तब्बल १२ हजाराहून अधिक मजूर व तंत्र रात्रंदिवस काम करत आहेत. विमानतळ कामाचा तसेच येथील पायाभूत सुविधांच्या कामाचा फेरआढावा घेण्याचे काम सिडकोकडून सुरू आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा ताबा ‘डीजीसीए’ला दिल्यानंतर दोन महिने तरी प्रत्यक्ष उड्डाण सुरू होण्यास लागतील. साधारण ॲाक्टोबरमध्ये यासंबंधीची प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण केली जाईल, अशापद्धतीचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. हे शक्य झाल्यास डिसेंबरमध्ये येथून विमानाचे उड्डाण होऊ शकेल. विमानतळाची आवश्यक कामे अंतिम टप्प्यात आहेत.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको