उरण : रवीवारी रात्री पासून सुरू झालेला पाऊस न थांबता सोमवार पर्यंत सतत कोसळत होता. विजेच्या कडकडाटसह कोसळणाऱ्या या सततच्या पावसामुळे उरण मधील जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. रात्रीच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरण पूर्व विभाग व उरण शहर परिसरातील काही ठिकाणची वीज गायब झाली होती. या काळात उरण शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले होते.

उरण तालुक्यात मे पासून आजपर्यंत सरसरी पेक्षा अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस आता पर्यंत झालेला सर्वाधिक पाऊस आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सततच्या पावसामुळे भात पिकावर काही प्रमाणात करपा रोग ही पडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सिडको,जेएनपीटी आणि संबधीत ग्रामपंचायतींकडून नालेसफाई न केल्याने एकाच वेळी सलग मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. तर दुसरीकडे महावितरण कडून ही पावसाळ्यापूर्वी ची कामे अर्धवट केल्याने गावात वीज वाहिन्या तुटण्याच्या घटनांमुळे तासन्तास वीज गायब होत आहेत. याच त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात उरणच्या पूर्व विभागातील अनेक गावांची वीज खंडीत झाल्याने रात्रभर नागरिक त्रस्त होते. ही स्थिती येत्या चार महिने कायम राहण्याची शक्यता आहे. हा परतीचा नक्षत्राचा पाऊस असल्याचा बोललं जातं आहे.रात्रीच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह हजेरी लावल्याने, या अचानक आलेल्या पावसामुळे भात खाचरातील भातपिके शेतात साचलेल्या गुडघाभर पाण्यात आडवी झाली आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झाले आहे.

कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून वादळी वारे ही वाहण्याची शक्यता हवामान विभाकडून वर्तविण्यात आली आहे. मात्र जलवाहतुकीला इशारा देणारा बावटा न लावल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे. ही वाहतूक कधीही बंद होण्याची शक्यता जलवाहतूक नियंत्रकानी व्यक्त केली आहे. धुक्याचे वातावरण : गेल्या काही दिवसांपासून उरण परिसरात ढगांनी झाकलेले वातावरण पसरले असून काहीकाळ धुक्याचे वातावरण ही पसरत आहे.