गेली अनेक दिवस वाट पाहण्यास लावणाऱ्या पावसाने शुक्रवारपासून खऱ्या अर्थाने दमदार हजेरी लावली असून पहिल्याच दिवशी नवी मुंबईत १४७ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. नवी मुंबई पालिकेने संपूर्ण शहराचा आपत्ती विकास आराखडा तयार केला असून ३ जून ते ३० सप्टेंबपर्यंत समुद्राला येणाऱ्या मोठय़ा भरतीच्या (उधाण) वेळा व दिवस जाहीर केला आहे. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा या काळात समुद्रात आदळणार असून ठाणे खाडीला लागून असणाऱ्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली या उपनगरांना या भरतीच्या पाण्याचा संभाव्य धोका आहे.
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि अरबी समुद्राच्या ठाणे खाडीचा भाग यामधील १०५ चौरस किलोमीटर भूभागावर नवी मुंबई हे शहर वसलेले आहे. खारजमिनीवर मातीचा प्रचंड भराव टाकून निर्माण करण्यात आलेल्या या नियोजित शहरात समुद्रातील भरतीचे पाणी साचण्याचा धोका गृहीत धरून उघाडी पद्धतीचे धारण तलाव सिडकोने प्रत्येक नोडच्या पश्चिम बाजूस तयार केलेले आहेत. भरतीचे पाणी आल्यास त्याला एके ठिकाणी साचवून शहरात जाण्यास तटबंदी करण्याची ही केरळची पद्धत त्या वेळी चांगलीच लक्ष्यवेधी ठरली होती. याची दखल जागतिक पातळीवरील संस्थांनी घेतलेली आहे. सिडकोने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि बेलापूर या खाडीकिनाऱ्याच्या नोडमध्ये भरतीचे पाणी येण्याच्या मार्गावर हे धारण तलाव बनविण्यात आले आहेत. वास्तविक हे तलाव वर्षांतून किमान एक वेळ तरी गाळ काढून स्वच्छ करण्याची आवश्यकता व्यक्त केली गेली आहे, मात्र नवी मुंबई पालिकेने या सर्व तलावांमधील गाळ काढण्याचे ठरविले तर सर्व खर्च या एकाच नागरी कामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेनुसार पालिका हे तलाव स्वच्छ करीत असून काही वर्षांपूर्वी वाशी येथील हा धारण तलाव स्वच्छ करून लाखो टन गाळ काढण्यात आला होता. संततधार पाऊस आणि त्यात भरतीच्या वेळा असल्यास या धारण तलावात येणारे पाणी उसळी मारून उपनगरात घुसण्याची शक्यता आहे. वाशीतील तलावाचे पाणी शिवाजी चौकापर्यंत येत असल्याचा अनुभव आहे.
यंदा समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा ३३ वेळा असून यात पाच दिवसातून दोन वेळा उधाण येणार आहे. शहरात पडणारा संततधार पाऊस आणि त्यात भरतीचे पाणी अशा प्रकारे नवी मुंबईत काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असल्याचा अनुभव आहे. पावसाच्या पाण्यामुळे शहरात दिवा ते दिवाळ्यापर्यंत ४४ ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने आठ विभागांत आठ नियंत्रण कक्ष तयार ठेवले आहेत. यात ठाणे बेलापूर मार्गावर एमएमआरडीएने नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गाचाही समावेश आहे. सातत्याने पावसाचा अंदाज घेणारी यंत्रणा पालिका मुख्यालयात तैनात असून अल्ट्रासाऊंड, हॉटलाइन, आणि हॅमरेडिओ या यंत्रणा २४ तास कार्यान्वित आहेत. पालिकेच्या सर्व अग्निशमन दलांनाही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास संभाव्य निवारा शिबिरांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. होमगार्ड आणि एनएसएसचे तरुण आपत्कालीन स्थितीत मदतीला धावणार आहेत.
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिका सर्वपरीने तयार असून सर्व प्रभाग कार्यालयांना २४ तास सतर्क ठेवण्यात आले आहे. दक्षता पथक म्हणून ३६ जणांचे एक पथक तयार करण्यात आले असून होमगार्ड, एनएसएसचे तरुण तसेच मच्छीमारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचा एक आराखडाच पालिकेने तयार केला असून यात शहरातील सर्व प्राधिकरणांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
– बाळकृष्ण पाटील, साहाय्यक आयुक्त, नवी मुंबई पालिका