नवी मुंबई महापालिकेचे नियोजन; हस्तांतरणासाठी शासनाकडे प्रस्ताव

नवी मुंबई : शीव-पनवेल मार्गावर नवी मुंबई पालिका हद्दीतील नऊ किलोमीटर मार्गातील दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याची तयारी नवी मुंबई महापालिकेने केली आहे. यासाठी हा मार्ग किमान सुशोभीकरणासाठी पालिकेला हस्तांतरित करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या मार्गावरील दिवाबत्तीचेदेखील एलईडीमध्ये रूपातंर करण्याची पालिकेची तयारी आहे. याशिवाय उड्डाणपुलांच्या खाली गर्दुले, भिकारी, समाजकंटक रात्रीच्या वेळी निवारा शोधत असल्याने या उड्डाणपुलांच्या खाली पालिका कुंपण घालणार आहे.

या मार्गातील वाशी टोलनाका ते बेलापूर उड्डाणपूल या नऊ किलोमीटर अंतराचा भाग हा नवी मुंबई पालिका हद्दीतून जात आहे. हा भाग सुशोभीकरण करून देण्यात यावा अशी पालिकेची जुनी मागणी आहे. मात्र या मार्गावरील विद्युत खांबावरील जाहिरात हक्क तसेच काही उड्डाणपुलावरील जाहिरात फलकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हस्तांतरित करण्यास तयार नाही. स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत पालिकेने या मार्गाचे अनेक वेळा सुशोभीकरण केलेले आहे, मात्र ते दरवर्षी पुन्हा खराब होत आहे. या मार्गावर सहा उड्डाणपूल येत असल्याने पालिकेने उड्डाणपुलाखालील भाग सुशोभित केला असून काही उड्डाणपुलांच्या खाली एलईडी दिव्यांच्या रोषणाई केली आहे. मात्र उड्डाणपुलाच्या खालील भाग चकाचक असताना वरील भाग मात्र दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.

शीव-पनवेल मार्गावरील नऊ किलोममीटर लांबीचा मार्ग जुन्या दिव्यांचा न ठेवता तेथे  एलईडी दिवे लावण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळेल अशी अपेक्षा पालिका प्रशासनाला आहे.   दिव्यांची रोषणाई होत असताना शहर अधिक सुंदर आर्कषक दिसावे यासाठी या दिव्यांच्याखाली असलेल्या दुभाजकांमध्ये चांगल्या दर्जाची माती टाकून त्या ठिकाणी झाडे लावण्याची परवानगी देखील मागण्यात आली आहे. मुंबई पुणे दुतगती मार्गावर दोन मार्गिकेमध्ये फुलांची झाडे अनेकांचे लक्ष वेधून घेत असून या वनराईमुळे समोरच्या वाहनांच्या दिव्यांचा लखलखाट डोळय़ावर पडत नाही. या मार्गावरील नऊ किलोमीटर मार्गावर असेच हिरवेगार दुभाजक तयार करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

उड्डाणपुलांखाली तारेचे कुंपण

या मार्गावर नवी मुंबई हद्दीत सहा उड्डाणपूल असून त्या खाली भिकारी आणि गुर्दुल्यांना बस्तान बसविले आहे. त्यामुळे पुलांना उंच तारेची कुंपण घातले जाणार असून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

नवी मुंबईतून शीव-पनवेल मार्गाचा भाग जात आहे. हा मार्ग एलईडीबरोबरच सुशोभित करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. केवळ उड्डाणपुलांच्या खाली सुशोभीकरण झाले आहे. हे सुशोभीकरण उड्डाणपुलांच्या वरील भागातही झाले पाहिजे यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. या मार्गावरील प्रवासात नवी मुंबईतून प्रवास करताना एक वेगळेपण जाणवावे असे सुशोभीकरण पालिका करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-अभिजीत बांगर, आयुक्त,महापालिका