पनवेल – रविवार रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या सलग पावसामुळे पनवेल शहरात काही ठिकाणी रस्त्याकडेला पाणी साचले परंतू यामुळे सखल भागात पाणी घरात शिरणे आणि वाहतूकीवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. 

सोमवारी सकाळी पावणेसात वाजण्याची समुद्राच्या भरतीची वेळ आणि पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. सकाळी सात वाजता पनवेल शीव महामार्गावर कळंबोली बसथांबा येथे पाऊस सुरूच असल्याने बसथांब्याच्या पुढे उड्डाणपुलाशेजारच्या रस्त्यावर पाणी साचले होते. परंतू मुख्य महामार्गावर पाणी न साचल्याने वाहतूक सूरळीत होती.

महामार्गावरील पावसामुळे वाहतूकीचा वेग मंदावला होता. सखल भागात पाणी साचल्याने याच पाण्यातून वाहने मार्गस्त होताना दिसली. सकाळी नऊ वाजेपर्यत पाऊस थांबल्यामुळे आणि समुद्राला ओहोटी लागल्याने कामावर जाणा-या नोकरदारवर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फारसा त्रास जाणवला नाही. 

हवामान वेधशाळेने सोमवारी दिवसभर पाऊस असल्याचे सांगीतल्याने सोमवारी सकाळच्या सत्रात नोकरी निमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती.