पनवेल : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासह पनवेल परिसरात बुधवारी (ता.२० ऑगस्ट) अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. महापालिकेचे आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी याबाबत मंगळवारी परिपत्रक जाहीर केले.

राज्य सरकारने पूर्वीच अतिवृष्टीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेल्या हवामान खात्याच्या सूचनेचा  विचार करून पनवेल महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच व्यावसायिक, प्रशिक्षण केंद्रांना ही सुट्टी लागू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह पनवेल परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची तीव्रता अधिक वाढू शकते.

या निर्णयामुळे बुधवारी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनावश्यक प्रवास टाळता येणार असून, शाळा व्यवस्थापनांना याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.