पत्नी व तिच्या प्रियकराच्या हत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सततच्या खटक्यांमुळे वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत पोहोचले होतेच, पण अध्र्यावरती हा डाव मोडला जात असतानाच या अधुऱ्या कहाणीला दुहेरी हत्याकांडाने अघोरी कहाणीचे रूप दिले.. कामोठे वसाहतीमधील सेक्टर १९ येथील ‘वेदांत दृष्टी’ या इमारतीमधील सदनिका क्रमांक २०१ मध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा थरार घडला.
खासगी शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या ध्रुवकांत विमल ठाकूर याचा विवाह सुश्मिता चंद्रमोहन ठाकूर हिच्यासोबत २०११ मध्ये झाला. हे दोघेही मूळचे बिहारचे. सुश्मिता ही कामोठे येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होती. लग्नाला तीन वर्षे उलटल्यानंतर ध्रुवकांत व सुश्मिता यांच्यात खटके उडू लागले. कौटुंबिक वाद धुमसत असतानाच बँकेत मार्केटिंगचे काम करणाऱ्या अजयकुमार सिंग याच्याबरोबर सुश्मिताचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे ध्रुवकांतला समजले. त्यानंतर रोजच्या भांडणाला वैतागून सुश्मिता व ध्रुवकांतने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
सप्टेंबर महिन्यात यासाठी दोघांनी ठाणे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अपिल दाखल केले. तरीही यातून मार्ग निघावा आणि लग्न टिकावे, यासाठी ध्रुवकांत प्रयत्न करीत होता. काही दिवसांपूर्वी गावी गेल्यावर त्याने सुश्मिताच्या वडिलांची भेट घेतली. सुश्मिताच्या वडिलांनी त्यावेळी ध्रुवकांतलाच या घटस्फोटावरून हिणवले होते. मंगळवारी रात्री घराची किल्ली शेजारच्यांकडून घेऊन ध्रुवकांतने घरात प्रवेश केला. काही तासानंतर रात्री उशिरा सुश्मिता घरी आली तेव्हा तिच्यासोबत अजयकुमारही होता. या दोघांना एकत्र पाहून ध्रुवकांत चिडला. त्यांच्यात जोरदार खटका उडाला. यावेळी घटस्फोटानंतर अजयसोबत माझे लग्न लावून दे, असा हट्ट सुश्मिताने ध्रुवकांतकडे धरल्याने त्याच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याने रागाच्या भरात अजयकुमारच्या गळ्यावर चाकूने वार केले. मग सुश्मिताचाही गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही ती जिवंत राहिल्याने उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या त्याने घडविली. तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. त्यानंतर आत्महत्येपूर्वी त्याने स्वत:च्या मोबाइलमध्ये खुनाचा कबुली जबाब ध्वनिमुद्रित केला. या जबाबासह एक पत्रही त्याने लिहिले. मग घरातील दोरी पंख्याला अडकवून गळफास घेण्याचा प्रयत्न त्याने केला. पण त्याचे वजन जास्त असल्याने दोरी तुटली आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. यानंतर ध्रुवकांतने स्वत:च्या बहिणीला सर्व हकिकत सांगितली. बहिणीने त्याला पोलिसांना शरण जाण्याचे सुचविल्यानंतर हा सर्व प्रकार कामोठे पोलिसांना कळला. पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी ध्रुवकांतची स्वत: चौकशी केली. त्यानंतर दुहेरी हत्येचा गुन्हा ध्रुवकांतवर दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ध्रुवकांतच्या लिहिलेल्या पत्रामध्ये व मोबाइल फोनमध्ये नोंदलेल्या जबाबामध्ये त्याने या हत्याकांडाला स्वत:सह सुश्मिता व तिचे वडीलही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. प्रियकर अजयकुमार सिंग याच्या कुटुंबियाचा पोलीस शोध घेत आहेत. मूळ रांची येथील राहणारा अजयकुमार हा दुबईमध्ये काम करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मंगळवारी दुबईहून तो मुंबईत आला होता.

जान ले चुके सनम..
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात पतीच पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाली करतो. ध्रुवकांतनेही त्या चित्रपटातल्याप्रमाणेच आपले लग्न अजयकुमारशी लावून द्यावे, असा आग्रह सुश्मिताने मंगळवारी रात्री धरला. त्यानंतर दोघांत जोरदार खटका उडाला आणि त्याची अखेर ‘दिल दे चुके सनम’ऐवजी ‘जान ले चुके सनम’ अशी शोकात्म झाली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband kill wife and her boyfriend
First published on: 10-12-2015 at 00:27 IST