नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात शीव पनवेल महामार्गाबरोबरच ठाणे बेलापूर मार्ग तसेच उरण ते जेएनपीटी या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. पालिका मुख्यालयाशेजारीच असलेला उड्डाणपुल सातत्याने अंधारात असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे हा मार्ग असून त्यांचे या मार्गाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. तर दुसरीकडे याच उड्डाणपुलाशेजारील समांतर रस्ताही अंधारात असल्याने नवी मुंबई महापालिका मुख्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावरील व उड्डाणपुलावरील अंधारामुळे नागरीक मात्र याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.    

हेही वाचा >>> ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रात ‘या’ महिन्यात दाखल होणार विद्युत बोट

नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळाला असून दुसरीकडे मुंबई व महाराष्ट्राला जोडणाऱ्या सायन पनवेल मार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्तीची लुकलुक सातत्याने अपघाताला आमंत्रण देत होती. अपुऱ्या वीजव्यवस्थेमुळे व महामार्गावरील अनेक बंद दिव्यांमुळे पालिकेला सातत्याने नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असे आरोप होत असल्याने पालिकेची बदनामी होत आहे. पालिकेने याच महामार्गावरील पथदिव्यांची लुलकुल बंद केली असून ११९४ पैकी तब्बल ६२८ बंद असलेल्या दिव्यांची दुरुस्ती करुन महामार्ग प्रकाशमय केला आहे. आता नवी मुंबई पालिका हद्दीतील शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी पालिकेची आहे. तर दुसरीकडे पालिका मुख्यालयाशेजारील असलेला उड्डाणपुल अतिशय वर्दळीचा असून सातत्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. याच मार्गावरुन उरण जेएनपीटी तसेच जेएनपीटीवरुन उरण फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. पालिका मुख्यालयासमोर असलेला मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असून त्याच्या दिबावत्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असते. पालिका मुख्यालयासमोर असलेल्या किल्ले गावठाण चौकात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. परंतू याच मार्गावर असलेला उड्डाणपुल व  या पुलाला समांतर असलेला दोन्ही बाजुकडील रस्ता अंधारात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता आहे. एकीकडे शीव पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीवरुन पालिकेला लक्ष केल्याने पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील दिवाबत्ती पालिकेकडे  हस्तांतरीत करण्यात आली तशीच पालिका मुख्यालयासमोरच असलेल्या उड्डाणपुलावरील दिवाबत्ती पालिकेकडे हस्तांतरीत करण्याची मागणी होत आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील लाड विचारणा केली असता महामार्ग प्राधिकरण सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे यशवंत होटकर यांना विचारणा केली असता त्यांचा संपर्क झाला नाही.

हेही वाचा >>> नवी मुंबई: शीव-पनवेल मार्गावर बेलापूर येथे वाहतूक कोंडी

 पालिका मुख्यालयासमोरील असलेला हा उड्डाणपुल सातत्याने अंधारात असल्याने पालिकेची बदनामी होते. त्यामुळे येथील सुविधा पालिका करत असेल तर त्याचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने द्यावा अशी विचारणा करण्यात येत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बंद दिवाबत्तीबद्दल सांगीतल्यानंतरही त्याकडे लक्ष दिले जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका