संतोष जाधव
नवी मुंबई- करोनाच्या दोन वर्षाच्या विलंबानंतर गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवसापासून ऑफलाईन शाळेला १५ जून २०२२ पासून सुरुवात झाली. पालिकेच्या सीबीएसई शाळांचे शैक्षणिक वर्ष मार्चमध्ये संपेलही परंतू वर्षभरात पालिकेच्या कोपरखैरणे येथील शाळेत अपुऱ्या शिक्षकांविना मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा कसा केला जातो याची प्रचिती सीबीएसईच्या कोपरखैरणे शाळेमध्ये पाहायला मिळाली सोमवारपासून पुन्हा सीबीएसई शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. परंतू जवळजवळ नर्सरी ते ६ वी पर्यंतचे १३७५ विद्यार्थी असून या शाळेमध्ये फक्त ९ शिक्षक शिकवण्यासाठी आहेत..त्यामुळे शिक्षकाअभावी नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरु असल्याची नाराजी पालक व्यक्त करत आहेत. शिक्षकांअभावी फक्त २ ते २.३० तासाची शाळा भरवली जात आहे.त्यामुळे गुरुवारी या शाळेचे पालक बोनकोडे येथील आमदार गणेश नाईक यांच्या कार्यालयात भेट घेणार असल्याची माहिती या शाळेतील पालकांनी दिली.
राज्यात महापालिकेची सीबीएसई शाळा सुरु करणारी नवी मुंबई महापालिका असा डंका पिटणाऱ्या पालिकेच्या कोपरखैरणे येथील शाळेत चक्क मदतनीसच शिक्षिका बनल्या आहेत तर दुसरीकडे अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची शाळा घड्याळी पाच ते सहा तासाऐवजी फक्त २ ते २.३० तासांसाठीच भरवली जात असल्याचा प्रकार सुरु आहे.त्यामुळे पालिकांमध्ये प्रचंड असंतोष असून नव्या शैक्षणिक वर्षात तरी आमच्या मुलांना पुरेसे शिक्षक मिळणार का असा प्रश्न पालक विचारु लागले आहेत. आमच्या लहानग्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा पालिका प्रशासन व्यवस्थेमुळेच झाला असल्याचा आरोप संतप्त पालक करु लागले आहेत. राज्यभरातल्या अनेक महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे चित्र असताना नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील शाळेत पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग असून या शाळेत तब्ब्ल १३०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.महापालिका चालवत असलेल्या या शाळेची व विद्यार्थ्यांची शिक्षकाअभावी फरफट सुरु असताना दुसरीकडे सीवूड्स येथे पालिकेची सीबीएसई शाळा ही खाजगी संस्थेच्याा मदतीने चालवली जात असून या शाळेत शिक्षण व शैक्षणिक दर्जा चांगला आहे. त्यामुळे फक्त पालिका चालवत असलेल्या सीबीएसई शाळेची अत्यंत वाईट अवस्था तर खाजगी संस्थेच्या मदतीने चालवत असलेली शाळा मात्र चांगल्या स्थितीत असा पालिका प्रशासनाचा व व्यवस्थापनाचा दुजाभाव पाहायला मिळत आहे. सीबीएसई शाळांचे शैक्षणिक वर्ष मार्च महिन्यात संपले.त्यानंतर नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी देखील पालिकेला मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक मिळत नाही अशी स्थिती आहे. पालिकेने एकीकडे शिक्षक भरतीसाठी स्वारस्य निविदा मागवल्या ,त्याला अनेकवेळा प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा नव्याने निविदा मागवल्या त्यात एका संस्थेचा सहभाग आला पण मागचे पाढे पंचावण्ण अशी स्थिती कोपरखैरणे या शाळेची पाहायला मिळत आहे.१३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ ३३ तुकड्या आणी फक्त ९ शिक्षक अशी स्थिती आहे. त्यामुळे बालशिक्षण हक्क कायदा आहे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याबाबत पालिका आयुक्तांना,शिक्षण उपायुक्तांना जाब विचारला पंरतू पुढे काय असा प्रश्न कायम आहे. एखाद्या प्रकल्पातून आर्थिक मलिदा व राजकीय पोळी भाजण्यासाठी विविध पक्षीय लोकप्रतिनिधी बेंबीच्या देठापासून ओरडत असताना दुसरीकडे कोपरखैरणे येथील सीबीएसईच्या शाळेत शिक्षक का मिळू शकत नाहीत असा प्रश्न मिर्माण झाला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागानेच ट्विट करुन गेल्यावर्षी पालिकेचे कौतुकही केले आहे.परंतू दुसरीकडे पालिका शिक्षण विभागात तब्बल १०० शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे शिक्षणाचा व गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱे झारीतले शुक्राचार्य आहेत तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा इतर महापालिकांच्या शाळेच्या तुलनेत चांगला असताना १३०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकाशाळांमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ होताना शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अपुऱ्या ठरत असलेल्या शिक्षकांची तात्काळ भरती करण्याची मागणी पालक व लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. सीबीएसई शाळेतील पालकांनी अपुऱ्या शिक्षकसंख्येमुळे आक्रमक होत दोन वेळा आय़ुक्तांची भेट घेतली. शिक्षक न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. तर पालिकेने शिक्षण भरती करण्यासाठी व सीबीएसई शाळा सुरु करण्यासाठी राबवण्यात आलेल्या स्वारस्य निविदेला प्रतिसाद मिळाला आहे असे सांगीतले जाते.गेल्या शैक्षणिक वर्षात पालिका शाळांत ४,४९६ विद्यार्थी वाढले तर दुसरीकडे १०० शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नवी मुंबई महापालिका सीबीएसई शाळांमध्ये वाढ करत असताना दुसरीकडे अपुरा शिक्षक वर्ग यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कोपरखैरणे येथील शाळेत दिसून येत आहे. या शाळेतील मुख्याध्यापक मारुती गवळी यांना विचारणा केली असता शिक्षक संख्या अपुरी आहे. पालिका प्रशासनाने योग्य व तात्काळ निर्णय घेतला पाहीजे.मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची खंत वा़टते.
पालिका शाळेत जवळजवळ ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या एकूण ५५ शाळा असून पालिकेमार्फत मराठी,हिंदी,इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या शाळा चालवल्या जातात.तर पालिकेत ५३ पूर्वप्राथमिक वर्गही चालवले जातात.पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या विविध माध्यमाच्या १८ शाळा आहेत. पालिकेच्या ३ सीबीएसई शाळा असून आणखी ३ शाळा नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अधांतरीच आहे त्यामुळे सीबीएसई शाळेत शिक्षक उपलब्ध करता येत नसल्याची दयनीय स्थिती पाहायला मिळत आहे. याबाबत पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशीही संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
आश्वासनांचे बुडबुडे….
शिक्षक भरतीसाठी संस्थेद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी निविदा मागवली. स्वारस्य निविदेला प्रतिसाद मिळाला.यापूर्वी दोन वेळा मागवलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता परंतू यावेळी स्वारस्य निविदा प्राप्त होत आहेत. तात्काळ शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असे शिक्षण विभागामार्फत सांगीतले जाते परंतू नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी हे आश्वासनांचे बुडबुडे सुरुच असल्याचे चित्र आहे.
आमच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण?
आमची मुले कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत शिकतात. मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच नाहीत. शिक्षकांअभावी शाळा फक्त काही तासच भरवली जाते. पालिकेने तात्काळ योग्य निर्णय घेऊन कोपरखैरणे येथील शाळेला पुरेसे शिक्षक उपलब्ध करुन दिले पाहीजेत. गुरुवारी या शाळेतील पालक आमदार नाईक यांच्या बोनकोडे येथील कार्यालयात भेट घेणार आहोत.-रेणूका म्हात्रे, पालक ,सीबीएसई शाळा कोपरखैरणे
कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक संख्या कमी असल्याने शिक्षक निवड प्रक्रिया राबवण्यासाठी स्वारस्य निविदा मागवण्यात आली असून त्याला प्रतिसाद मिळाला आहे .त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.– राजेश नार्वेकर आयुक्त नवी मुंबई महापालिका