चारफाटा येथील कारवाई केलेल्या भूखंडावर पुन्हा अनधिकृत व्यवसाय
सिडकोने १२ जानेवारीला चारफाटा एसटी स्टँड परिसरातील अनधिकृत गाळे, झोपडय़ा हटविल्या आणि तारेचे कुंपणही घातले, मात्र या कुंपणाच्या आतच पुन्हा एकदा अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. अनधिकृत हातगाडय़ा व वाहनांमुळे चारफाटा परिसर पुन्हा जैसे थे स्थितीत आहे.
सिडकोने १९७० ला संपादित केलेल्या हजारो एकर जमिनीवर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. सिडकोच्या विकास आराखडय़ासाठी आवश्यक असलेल्या जमिनी कमी पडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड देण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या भूखंडांवर अतिक्रमण झाल्याची जाग सिडकोला आली. अनधिकृत बांधकामविरोधी विभागाकडून सकाळी कारवाई केली जाते. त्यानंतर काही तासांतच तिथे पुन्हा अनधिकृत व्यवसाय सुरू केले जातात. काही ठिकाणी तर दोन वर्षांनी कारवाई होते, त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे आधीच सावध असतात. कारवाई हा केवळ फार्स असल्याची भावना व्यक्त केली जात होती. मात्र सध्या कारवाई केलेल्या भूखंडाचा ताबा घेतला असून कुंपणही टाकले आहे. तरीही या भूखंडावर अनधिकृत व्यावसायिकांचा कब्जा आहे.
कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची खबरदारी घेणे ही नोडल विभागाची जबाबदारी आहे. चारफाटा येथील कारवाई करण्यात आलेल्या भूखंडाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– शिवराज एस. पाटील, मुख्य नियंत्रक, सिडको अनधिकृत बांधकाम विभाग
