पनवेल : दिवाळी सुट्टीच्या काळात काही दिवसांसाठी अतिक्रमण विरोधी कारवायांना विराम मिळाल्यानंतर, सिडको महामंडळाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला. खारघर सेक्टर १३ मधील सिडको अधिसूचित भूखंडावर उभारण्यात आलेली बेकायदा पाच मजली इमारत पाडून सिडकोने अतिक्रमण करणा-यांवर कडक संदेश दिला आहे.

गुरुवारच्या कारवाईवेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या देखरेखीखाली पार पडली. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत ३० ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या या निष्कासन मोहिमेत, खारघर सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक २२ व २३ (मौजे खारघर सर्वे नंबर ४४०) येथील सुमारे ३५ चौ.मी. क्षेत्रफळाची आरसीसी इमारत आणि परिसरातील सुमारे ८०० चौ.मी. क्षेत्रफळावरील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच भूखंड क्रमांक १० व ११ वरील आरसीसी​चे अनधिकृत बांधकाम​ सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. २०० चौ.मी. क्षेत्रफ​ळावर बांधकाम केले होते. येथील बांधकाम सुद्धा हाय रिच बूम व पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आले.

ही सर्व बांधकामे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. त्यामुळे सिडकोकडून ही कारवाई करण्यात आली. गुरुवारची मोहीम​ सिडकोचे मुख्य दक्षता अधिका​री मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस, सिडको पोलीस पथक, महावितरण अधिकारी, तसेच सिडको व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांनी सहभाग घेतला.

या कारवाईसाठी एक हाय रिच बूम, एक पोकलेन, पाच कामगार आणि दोन जीपचा वापर करण्यात आला. सिडकोच्या या कडक कारवाईनंतर खारघर परिसरातील अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे​. ​गेल्या नऊ महिन्यात​ सिडकोच्या अतिक्रमण विऱोधी कारवाईत स्थानिक पोलिसांकडून बंदोबस्त व्यवस्थित मिळत असल्याने आतापर्यंत २ लाख ३९ हजार चौरस मीटर क्षेत्र​ अतिक्रमण मुक्त ​झाले​.