पालिकेचे दुर्लक्ष; ‘लोकल टॅक्स’ द्या आणि कुठेही व्यवसाय करा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : गेली सहा महिने मोकळा श्वास घेत असलेले पनवेलमधील पदपथ पुन्हा एकदा बेकायदा फेरीवाल्यांनी गजबजले आहेत. मुख्य चौक, रस्त्यालगतचे पदपथांवर खाद्यपदार्थ आणि पालेभाज्या विक्रेत्यांनी आपले ‘दुकान’ मांडले आहे. ‘लोकल टॅक्स’ दिला की कोणीही कारवाई करीत नसल्याचे हे विक्रेते सांगत आहेत. पालिका अतिक्रमण पथकाच्या कारवाईची भीती त्यांच्यात राहली नाही. त्यामुळे कोणीही या..‘लोकल टॅक्स’ भरा आणि आणि बेकायदा व्यवसाय करा..हे पनवेलचे चित्र कायम आहे.

पनवेल पालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्या महिन्यात पदपथावरील अतिक्रमण नियंत्रणाची मोहीम तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी घेतली होती. त्यानंतर मोठी कार्यवाही आजपर्यंत कधीच झालेली नाही. पालिकेने अतिक्रमण नियंत्रणासाठी चार विविध प्रभागांमध्ये गस्त पथक नेमली आहेत. मात्र या विक्रेत्यांना आश्रय मिळत असल्याने ही ‘दुकाने’ राजरोस सुरू आहेत.

पदपथासोबत रस्तासुद्धा अडविण्याची नवी पद्धत पालिका क्षेत्रात रुजली आहे. खारघर येथील उत्सव चौकातून सेंट्रलपार्ककडे जाणाऱ्या मार्गावर आणि त्यापुढे श्रीकृष्ण मंदिराशेजारील चौकात, गोखले विद्यालयाशेजारी, कळंबोलीमध्ये विद्यालयाशेजारी, रोडपाली येथील पोलीस मुख्यालयाशेजारी, नवीन पनवेल येथे रेल्वेस्थानकाशेजारी ते शिवाकॉम्पलेक्सच्या परिसरात, कामोठे येथे मुख्यरस्त्यावर आता वाहनांतून व्यवसाय होताना दिसत आहे.

यामध्ये खाद्यपदार्थ आणि पालेभाजी विक्रेत्यांनी रस्तेही अडविल्याचे दिसते. परंतु पनवेल पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांना हे बेकायदा व्यवसाय दिसत नाहीत. उलट कार्यवाही करण्यासाठी येणार असल्याची माहिती अगोदर संबंधित विक्रेत्याला कळविली जात आहे.

‘मलई’ कोण खातेय?

खारघर येथील नारळपाणी विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षात नारळाची घाऊक बाजारातील खरेदी किमतीपेक्षा १० रुपये अधिकचा ‘लोकल टॅक्स’ द्यावा लागतो. त्यामुळे पन्नास रुपयांना एका नारळपाण्याची खरेदीमूल्य ४० रुपयांना आम्हाला मिळते. त्यानंतर आम्ही ग्राहकांना पन्नास रुपये या दराने नारळपाणी विक्री करतो. ज्या घाऊक विक्रेत्यांकडून आम्ही नारळपाणी १० रुपये जादा देऊन खरेदी केले आहे. तोच घाऊक व्यापारी पालिका व अतिक्रमण नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांची जबाबदारी घेतो. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करण्यास येथे कोणीही रोखत नाही. कळंबोली येथील डीमार्टसमोरील नारळपाणी विक्रेत्याने, एका राजकीय पक्षाच्या कार्यालयातील एका व्यक्तीकडे  महिन्याचा ‘लोकल टॅक्स’ द्यावा लागत असल्याने आपण व्यवसाय करू शकत असल्याचे सांगितले. पालिकेचे अधिकारी व पथक पारदर्शक काम करत असेल तर नारळपाण्याची ‘मलई’ नेमकी कोणाच्या तोंडात जात आहे. पालिका प्रशासनाच्या आश्रयाशिवाय हे शक्य कसे होते असा प्रश्न सामान्य पनवेलकरांना पडला आहे.

पालिकेने अतिक्रमण  नियंत्रणासाठी प्रभाग अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून कारवाईत खारघर व तळोजा परिसरात २१ जणांवरील कारवाईत १८ हजार, कळंबोलीत १५ जणांवरील कारवाईत १७ हजार रुपये, कामोठे येथून ९७ हजार रुपये आणि पनवेल परिसरातून ४२ हजार ४०० रुपये वसुलीची कारवाई करण्यात आली.

-धैर्यशील जाधव, साहाय्यक आयुक्त, पनवेल पालिका 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal hawkers on footpath in panvel zws
First published on: 08-10-2020 at 00:51 IST