दिवाळीनंतर एमआयडीसीचा कारवाई करण्याचा इशारा

ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्ता रुंदीकरणाचे काम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गी लावले. या कामात प्रभावित होणाऱ्या दुकानांचे ‘एमआयडीसी’कडून पुनर्वसन करण्यात आले. तरीही या ठिकाणच्या गाळेधारकांनी बाधित जागा सोडलेली नाही. अर्धवट तोडण्यात आलेल्या गाळ्यांमध्येच त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला आहे. एमआयडीसीने येथील गाळेधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. दिवाळीनंतर या गाळ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर दिघ्यानजीक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यानजीकच्या गाळ्यांवर पालिकेने कारवाई केली.

यात बाधित होणाऱ्या दुकानदारांना एमआयडीसीकडील रामनगर येथे मोकळ्या भूखंडावर १४ कोटी रुपये खर्चून ६४ गाळे उभारले. काही महिन्यांपूर्वी सदरचे गाळे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला; मात्र या भागांत तोडलेल्या गाळ्यांच्या उर्वरित जागेवर नव्याने दुकाने थाटली आहेत. त्यामुळे कोटय़वधींच्या खर्चाचे काय, असा सवाल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

पुनर्वसन झालेल्या गाळेधारकांनी आहे त्याच जागेत व्यावसायिक गाळे बांधताना नवी मुंबई महापालिकेची आणि एमआयडीसीची परवानगी घेतलेली नाही. एमआयडीसीकडून काही दिवसांपूर्वी सदरच्या गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र गाळेधारक जागा सोडायला तयार नाहीत.

गाळेधारकांचे पुनर्वसन रामनगर येथील एमआयडीसीच्या भूखंडावर करण्यात आले आहे. पालिका जागेच्या भाडय़ापोटी नाममात्र शुल्क आकारणार आहे. गाळेधारकांनी येथे अतिक्रमण केल्याने त्यांना  नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

– अविनाश माळी, एमआयडीसी उपअभियंता

विनापरवाना दुकानांची माहिती एमआयडीसीला देण्यात आली आहे. एमआयडीसीच्या निर्देशानुसार सदर ठिकाणी कारवाई करण्यात येईल.

– प्रकाश वाघमारे, दिघा विभाग अधिकारी