पनवेल : खारघर हे सुशिक्षितांचे उपनगर म्हणून ओळखले जाते. सर्वाधिक शाळा, महाविद्यालये याच उपनगरात आहेत. तसेच दारुविक्री आणि परमीट रुमचे चार परवाने शासनाने येथे दिले आहेत. मात्र जानेवारी महिन्यापासून २५ एप्रिलपर्यंत या ११५ दिवसांत खारघर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत विनाहेल्मेट प्रवास करणारे तीन हजार २८३ दुचाकीस्वार आणि ३२ मद्यपींवर पोलिसांनी कारवाई केली. ११५ दिवसांत वाहतूक पोलिसांनी तब्बल १२ हजार २१२ जणांवर वाहतूक नियम तोडल्याने कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल १० लाख ४७ हजार ५०० रुपयांचा महसूल गोळा केल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.

स्मार्ट शहर म्हणून खारघरची ओळख होत असली येथील रहिवाशांच्या अंगी वाहन चालविण्याचे नियम पाळण्याची साक्षरता कमी असल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसत आहे. ७१ जणांना मागील ११५ दिवसांत विरुद्ध दिशेने वाहन चालविताना पोलिसांनी पकडले आहे. सिग्नल तोडणाऱ्या २३५ जणांवर ११५ दिवसांत पोलिसांनी कारवाई केली. मोटार चालविताना सीटबेल्ट लावणे गरजेचे असताना २५१ जणांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली. तसेच वाहन चालविताना २०० चालकांना मोबाइलवर बोलताना पोलिसांनी पकडले. वाहन चालवताना अवैधपणे मार्गिका ओलांडणाऱ्या वाहन चालविणारे म्हणजे लेन कटींग करणारे ६२ जणांना पोलिसांनी पकडले. अल्पवयीन मुले वाहन चालविताना मागील वर्षी आठ जणांना पकडले होते. तर या वर्षी चार महिन्यांत आतापर्यंत एकावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी १२ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असली तरी यामधील २५ टक्के वाहनचालकांना दंडाची कारवाई झाल्याची माहिती प्रत्यक्षात मिळेल. कारवाई झाल्यानतंर काही दिवसांनी वाहन मालकांना मिळणारी ऑनलाइन दंडाची पावती मिळत असल्याने यातील शेकडो वाहन मालकांना कारवाईची कल्पना नसेल. कारवाईनंतर थेट बँक खात्याचा लघुसंदेश जेवढ्या तत्परतेने येतो तसा जलदगतीने लघुसंदेश येणे महत्त्वाचे आहे.

अल्पवयीन मुलांकडे वाहने चालविण्याचा परवाना नसताना सुद्धा पालक त्यांच्या हाती दुचाकी देतात असे आमच्या कारवाईत आम्हाल आढळते. आम्ही संबंधित मुलांच्या पालकांना येथे येऊन कारवाईस सामोरे जाण्याचे आवाहन करतो. अपघाती मृत्यूचे प्रमाण कसे खारघरमध्ये कमी होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. पनवेल महापालिका लवकरच खारघरच्या ६६ ठिकाणी नवीन सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणार आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे अधिक सोपे जाईल. संतोष काणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक विभाग