नवी मुंबई : कडक उन्हाळा, त्यानंतर आलेल्या पावसाने ढासळलेली फळांची आवक आणि बदलती जीवनशैली – या तिन्ही घटकांचा परिपाक सध्या वाशीतील मुंबई एपीएमसी फळ बाजारात स्पष्ट दिसतो आहे. पारंपरिक भारतीय फळांच्या तुलनेत चव, टिकाऊपणा आणि आरोग्याच्या दृष्टिकोनात वरचढ ठरणारी परदेशी फळे आता ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरत आहेत. दररोज तब्बल ५० ते ६० टन परदेशी फळांची आवक वाशी फळ बाजारात होत आहे.
ग्राहकांमध्ये ‘इम्पोर्टेड’ फळांची मागणी गेल्या काही आठवड्यांपासून लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमेरिका, न्यूझीलंड, तुर्की, चिली, दक्षिण आफ्रिका, इटली, पेरू, व्हिएतनाम, इराण आणि इराक या देशांतून येणाऱ्या फळांचा बाजारात दबदबा आहे. यातील अनेक फळे औषधांसारखी काम करतात. शरीरातील विषारी घटक काढून टाकणे, अँटीऑक्सिडंट्सची मात्रा वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी त्यांची मदत होते. ‘आजचा ग्राहक केवळ चव आणि दर पाहत नाही. फळ टिकते का, पोषणमूल्य किती आहे, शरीराला किती फायदेशीर आहे, हे पाहतो,‘ असं सांगताना फळ व्यापारी तन्वीर शेख हे नमूद करतात.
अवाकाडो, ब्लूबेरी, ड्रॅगन फ्रूट, किवी यासारखी फळे मधुमेह, कोलेस्टेरॉल, वजन नियंत्रण यासाठी फायदेशीर मानली जातात. ‘इन्स्टंट एनर्जी’ देणाऱ्या या फळांकडे डाएट करणारे, व्यायाम करणारे, नवतरुण, आणि वयस्कर नागरिकही अधिक झुकताना दिसत आहेत.
भारतीय सफरचंदांचा हंगाम ऑगस्टनंतरच सुरू होतो. त्यामुळे सध्या न्यूझीलंड, वॉशिंग्टन, तुर्की येथील सफरचंद बाजारात दिसत आहेत. इराण व इराकमधील सफरचंदे किमतीच्या तुलनेत दर्जेदार असल्याने त्यांनाही उठाव आहे. द्राक्षांचाही हंगाम संपल्याने न्यूझीलंडमधून आलेली द्राक्षे बाजारात चांगली प्रतिसाद घेत आहेत. अमेरिकन ॲवकाडो, चिलीची प्लम, व्हिएतनाममधील ड्रॅगन फ्रूट आणि पेरूची ब्लूबेरी यांचे आकर्षणही वाढले आहे.
सध्याचे काही प्रमुख दर (घाऊक)
सफरचंद (तुर्की/न्यूझीलंड) – १६५ ते २४० रु./किलो
ॲवकाडो (अमेरिका/चिली) – २०० ते २५० रु./किलो
ब्लूबेरी (चिली/पेरू, १.५ किलो बॉक्स) – १५०० ते २००० रुपये
किवी (इटली/न्यूझीलंड) – ८०० ते १२०० रु./किलो
ड्रॅगन फ्रूट (व्हिएतनाम) – ५०० ते १२०० रु./किलो
द्राक्षे (न्यूझीलंड) – दहा किलो बॉक्स २००० ते २२०० रुपये
प्लम (चिली) – १२०० ते १३५० रुपये किलो
आरोग्यसाक्षरता वाढल्यामुळे ग्राहक दर्जा, चव आणि पोषणमूल्य याकडे झुकत आहेत. त्यामुळे परदेशी फळांचा ट्रेंड केवळ हंगामापुरता मर्यादित न राहता वर्षभर टिकण्याची शक्यता आहे. – मोहम्मद नझीम, परदेशी फळ व्यापारी, वाशी एपीएमसी
कधीकाळी केवळ हॉटेल्स किंवा सुपरमार्केटपुरती मर्यादित असणारी परदेशी फळांची मागणी आता स्थानिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचली आहे. मुंबई आणि नवी मुंबईसारख्या शहरांतील मध्यमवर्गीय ग्राहकही आता आठवड्यातून एकदा का होईना, ॲवकाडो, किवी किंवा ब्लूबेरी खरेदी करतात.