पनवेल: १२ वर्षीय मूकबधीर बालकाचा खून शरीर सूखासाठी युवकाने केल्याचे पोलीसांच्या तपासात समोर आले आहे.  मृत बालकाचा मृतदेह मुंब्रा पनवेल महामार्गालगतच्या किरवली गावाजवळील पाण्याच्या डबक्याशेजारी बुधवारी सकाळी सापडला होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी काही तासांत या खून प्रकरणातील मारेकरी युवकाला ताब्यात घेऊन डायघर पोलीसांच्या स्वाधीन केले. 

१२ वर्षीय बालकाच्या बेपत्ता प्रकरणी मंगळवारी डायघर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. तळोजा पोलीसांना बालकाचे शव सापडल्यानंतर त्यांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तळोजा पोलीसांसोबत नवी मुंबई पोलीसांचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सूनील शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक दशरथ विटकर, श्रीनिवास तुंगेनवार, हर्षल कदम, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मंगेश वाट, हवालदार नितिन जगताप, पोलीस नाईक सचिन  टीके, अशोक पाईकराव यांचे पथक घटनास्थळी बालकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी दिवसभर चौकशी करत होते.

हेही वाचा : फळे विक्री उपकर बुडवणाऱ्यांवर कारवाई, एपीएमसी प्रशासनाचा निर्णय; प्रामुख्याने आंब्याच्या जातीचा उल्लेख करणे अनिवार्य

बालकाच्या मृतदेहाचा शव विच्छेदनाचा वैद्यकीय अहवाल रात्री उशीरा पोलीसांच्या हाती येईपर्यंत बालकाच्या मृतदेहाची अवस्था पाहून पोलीस अधिकारी शिंदे व त्यांच्या पथकाने बालक राहत असलेल्या ठिकाणाहून काही संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांची उलट तपासणी केली. मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या परिसराकडे जाणा-या रस्त्याकडील सीसीटिव्ही कॅमेरे पोलीसांनी वारंवार तपासून पाहीले.  बालकाचे कपडे आणि अंगवस्त्र मृतदेहाशेजारी काढल्याचे पोलीसांना घटनास्थळी दिसले तसेच एक गुटख्याची पुडी पोलीसांना मृतदेहाशेजारी सापडली होती. या एका गुटख्याच्या पुडीवरुन पोलीसांनी ताब्यात असणाऱ्या संशयीतांकडे चौकशी केली. रात्री उशीरापर्यंत संशयीतांना डायघर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामधील एका २१ वर्षीय युवकाने शरीर सूखासाठी बालकाचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली. डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी बालकाच्या खूनाप्रकरणी संबंधित २१ वर्षीय युवकाला अटक केली आहे.