नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १७ हजाराजवळ येऊन पोहोचली आहे. शहरात आज २७८नवे करोनाबधित आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १६ हजार ९५७ झाली आहे.
शहरात आज ४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४४१ झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल १२ हजार ४७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत २५ हजार ८४१ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.
करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक होत आहेत. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नेरुळ येथे पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा तयार केली आहे.तर दुसरीकडे अधिक चाचण्या करण्यासाठी पालिका आयुक्त विविध उपाय करत आहेत.