नवी मुंबई : वाशीत शाळकरी मुलींची छेड काढल्याप्रकरणी एका २५ वर्षीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवानाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अशाच पद्धतीने अनेक शाळकरी मुलींची छेड काढल्याचे समोर आले आहे. सूरज कुमार जगत राम असे आरोपीचे नाव आहे. तो मूळ काश्मीर येथील रहिवासी व मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपाई म्हणून नोकरी करत आहे. गेल्या आठवड्यात त्याने एका शाळकरी मुलीची छेड काढली आणि निघून गेला होता. या बाबत पीडित मुलीने तिच्या पालकांना माहिती दिली होती. दोन दिवसांच्या पूर्वी पीडिता आपल्या पालकांच्या समवेत बाजारात गेली असता त्याठिकाणी आरोपीही फिरत होता. त्यावेळी पीडितेने त्याला ओळखले.

हेही वाचा : जसखार ते करळ-सोनारीला रस्ता देण्याची मागणी, चार गावातील नागरिकांचा रेल्वे रुळावरून धोकादायक प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपली छेड काढणारा हाच आहे, हे सांगताच पालकांनी त्याला पकडले व काही नागरिकांच्या मदतीने वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेने दिलेल्या तक्रारीची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने गेल्या १५ दिवसात अशाच पद्धतीने अनेक शालेय मुलींची छेड काढल्याचे तपासात समोर आले आहे. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.