उरण : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संवेदनशील उरण सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या मोरा पोलीस ठाण्यासाठी उरण शहरात नवीन इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे काम २०१९ पासून १ कोटी ६५ लाखांच्या निधी अभावी रखडले आहे. सार्वजनिक बांधकामाला निधी मिळत नसल्याने ही इमारत पडीक बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उद्घाटनापूर्वीच भंगारात निघाली असून सध्या या इमारतीला झाडा झुडपांचा विळखा पडला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडून खर्च करण्यात आलेला इमारतीवरील ८५ लाखांचा निधी वाया जातो कि काय असा प्रश्न उरणकरांना पडला आहे.

सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किनारपट्टीवरील सागरी पोलीस ठाण्यांना विशेष महत्त्व प्राप्त करून दिले आहे.त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली. या महत्वाच्या पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शन पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या ८५ लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम २०१८ ते २०२० या वर्षात हाती घेतले आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : कार चालकाची एनएमएमटीला मागून धडक, तलवार काढत बस चालकाला केली शिविगाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी ८५ लाखांचा निधी २०१८ मध्ये मंजूर करुन दिला.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे सदर इमारतीचे काम अर्धवट स्थितीत आजतागायत पडून राहिले आहे. तरी सदर इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी हनुमान कोळीवाडा येथील माजी सरपंच जयवंत कोळी यांनी केली आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम निधी अभावी रखडले आहे.शासनाकडून आतापर्यंत ८५ कोटी निधीचा वापर झाला असून कामपूर्ण करण्यासाठी आणखी १ कोटी ६५ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकामचे अभियंता नरेश पवार यांनी दिली आहे.