नवी मुंबई : पाम बीच मार्गावरील सायन-पनवेल महामार्गाखालील वाशीजवळील उड्डाणपुलाखालील कामाला नुकतीच सुरुवात केली आहे. नेरुळहून वाशीकडे व वाशीहून नेरुळकडे अशा दोन्ही दिशेला वाशीजवळ उड्डाणपुलाखालील पाम बीच मार्गाची एक-एक मार्गिका खोदल्यामुळे पाम बीच मार्गावरील वाहतूक संथ गतीने होत आहे. पालिका या ठिकाणच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी जवळजवळ दोन कोटींपेक्षा अधिकचा खर्च करणार आहे. पाम बीच मार्गावर किल्ले गावठाण ते आरेंजा कॉर्नरपर्यंत विविध ठिकाणी असलेले छोटे पूल व जंक्शनच्या ठिकाणाच्या रस्त्याची मायक्रोसर्फेसिंगद्वारे दुरुस्ती करण्यात येत असून या कामासाठी वस्तू व सेवा करासह १० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. पाम बीच मार्गावरील वाशीनजीकच्या हायवे उड्डाणपुलाखालील मार्गाचेही काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. पावसाळ्यात याच उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साठण्याचे प्रकारही पाहायला मिळतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणच्या रस्त्याचेही काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ येथील सारसोळे चौकाजवळील छोट्या पुलाच्या ठिकाणचे मायक्रोसर्फेसिंगचे काम करण्यात आले आहे.

हेही वाचा : वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

पामबीच मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. त्यामुळे या मार्गावरील वाशी पुलाच्या खालील सुरू करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे संथ गतीने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या कामाबाबत पालिकेने व ठेकेदाराने योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या मार्गावर वेगवान वाहने धावत असल्याने अपघाताचाही धोका संभवतो. त्यामुळे कामाच्या परिसरात योग्य बॅरिकेडिंग करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : पालिकेकडूनच अतिक्रमण, वाशी सेक्टर १४ मध्ये पदपथावर कंटेनर हजेरी कार्यालय

पामबीच मार्गावर काँक्रीटीकरण

● एकूण खर्च – २ कोटी २६ लाख

● कालावधी- १२ महिने पावसाळ्याचा कालावधी वगळून

● काम पूर्ण करण्याचा कालावधी- २५ जुलै २०२५

● दोषनिवारण कालावधी- १० वर्षे

पामबीच मार्गावरील सायन-पनवेल हायवे पुलाखालील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत असून या पुलाखाली पावसाळ्यात सातत्याने पाणी साठण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे थीन व्हाइट टॉपिंग पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे. या कामाबाबत व रहदारीबाबत ठेकेदाराला योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका