पनवेल – शीव पनवेल महामार्गावरील कामोठे पथकर (टाेल) नाक्याला शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या आकाराच्या अवजड ट्रेलरने दिलेल्या धडकेत टोलनाक्यावरील बूथमध्ये बसलेला कर्मचारी जबर जखमी झाला तर टोलनाक्याचे पाच लाख रुपयांचे नूकसान झाले. या प्रकरणी ट्रेलरचालका विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली. शीव पनवेल महामार्गावर मोठ्या आकाराचे अवजड वाहन जात होते. या मोठ्या आकाराच्या ट्रेलरवर इतर इंजीनाची वाहतूक होत असल्याने यासाठी टोलनाक्यावर स्वतंत्र मोठी मार्गिका उपलब्ध असताना सुद्धा हलक्या वाहनांसाठीच्या मार्गिका क्रमांक ४ येथील बूथजवळून हा ट्रेलर काढण्यासाठी चालक आग्रही असल्याने ही घटना घडली.
ट्रेलर क्रमांक एमएच २० ईजी ९३२५ हा चालक ललन कुमार श्रीगिरीनारी कोरी हा चालवित होता. ललन कुमार हा भरधाव वेगात हा ट्रेलर चालवित असल्याने टोलनाक्याला धडक बसली. या धडकेत टोलनाक्यावरील ४६ वर्षीय कर्मचारी विजय शुक्ला हे जखमी झाले. शुक्ला यांना तातडीने पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तसेच या धडकेत टोलनाक्यावरील बूथचे केबीन, बूथमधील संगणक व इतर वस्तूंचे सूमारे पाच लाख रुपयांचे नूकसान झाल्याचे कामोठे टोलनाक्या वरील कर्मचारी केशव कारगुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. कामोठे व खारघर येथील टोलनाक्यांची वसुलीची रक्कम शासनाकडे वर्ग होत असल्याने शासकीय मालमत्तेचे नूकसान केल्याप्रकरणी चालक ललनकुमार याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांच्याकडे सोपविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएनएस २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), ३२४(५) त्याचसोबत मोटार कायद्याप्रमाणे ४(५) ६(२) १७७ ए, १८४ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याला सात वर्षांखाली शिक्षेची तरतूद असल्याने ट्रेलर चालक ललनकुमार याला बीएनएसएस २०२३ चे कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. चालक ललन कुमार याने भरधाव वेगाने आणि टोलनाक्यावरून मोठ्या आकाराची अवजड वाहने जाण्यासाठी इतर मार्गिकांची तरतूद असताना कोणत्या कारणासाठी अतिघाई करून टोलनाक्याला धडक दिली याची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे हे करीत आहेत.