पनवेल – धारावी येथे राहणारे आणि समाजमाध्यमांवर रिल बनविणारे हौशी कलाकार तरुण शीव पनवेल महामार्गावरून लोणावळा येथील सहलीसाठी दुचाकीवरुन जात असताना बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता जात खारघर येथील उड्डाणपुलावर मागून येणा-या भरधाव मोटारीने या तरुणांच्या दुचाकीला मारलेल्या धडकेत तब्बल ९ तरुण जबर जखमी झाले. तसेच २३ वर्षीय मानव कुन्चीकोरवे हे तरुण जागीच ठार झाला. या दुचाकीला लागलेली धडक एवढी भयंकर होती की मानव हा पुलावरुन खाली फेकला गेला. नऊपैकी अजूनही दोन तरुण अत्यवस्थ आहेत. जखमींवर कामोठे येथील महात्मा गांधी मीशन (एमजीएम) रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली.
खारघर येथील हिरानंदाणी कॉम्प्लेक्स इमारतीसमोरील उड्डाणपुलावर हा गंभीर अपघात घडला. यातील अनेक तरुण हे मुंबईतील धारावी येथील धोबीघाट येथे राहणारे आहेत. जखमींपैकी एकाच्या मित्रा असलेल्या आशिषकुमार साहु याने खारघर पोलिसांत दिलेल्या तक्रारीमध्ये हा सर्व हौशी नृत्य करणा-यांचा एक समुह आहे. सहलीसाठी ही मित्रमंडळी लोणावळा येथे जात होती.
रिल्स बनवून नृत्याचे विविध प्रकार हे तरुण नेहमी समाजमाध्यमांवर प्रसारीत करत असतात बुधवारी मध्यरात्रीनंतर या तरुणांचे लोणावळा जाण्याचे ठरल्यानंतर पहाटे पावणेपाच वाजता दुचाकीने ही मंडळी खारघर येथील महामार्गावरील उड्डाणपुलावरुन जात असताना मागून आलेल्या फीयाट लिनीया इमोशन या मोटारीने सुभाष शेख, समीर मोहम्मद, इस्तियाक अन्सारी, नवीन रावा, महेश गड्डे, लकी कोळी, साहील कोन्चीकोरवे, मावन कोन्चीकोरवे, सागर व संकेत (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या दुचाकींना ठोकले. मानव हे ज्या दुचाकीवर बसले होते तेथून ते उड्डाणपुलावरुन खाली कोसळले.
या घटनेची माहिती वाहतूक पोलीस आणि खारघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळल्याव तातडीने पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मोटार चालक तेथून पळून गेला. पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेऊन चालक मद्यपी होता का हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली. अद्याप त्याचा अहवाल मिळाला नसल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजय कांबळे यांनी दिली.