आजच्या आधुनिक काळात नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे भविष्यात आणखी काय परिस्थिती निर्माण होईल काही सांगता येत नाही. परंतु, याकाळात आपल्या कवितांची गरज नक्कीच भासणार आहे, असे मत कवी अशोक नायगावकर यांनी मांडले. महेंद्र कोंडे लिखित बावनकशी या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

कोणतीही कविता वाचताना त्यातील भावविश्व डोळ्यांसमोर दिसते. ही खरी कवितेची ताकद आहे. कविता लिहिणाऱ्याचा कधी कोणी माजी कवी असा उल्लेख करत नाही, असे अशोक नायगावकर यावेळी म्हणाले.

साहित्य क्षेत्र फार मोठे आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयांसारखा वारसा आपल्याला लाभला आहे. त्यामुळे ही वाचक चळवळ देशभर पसरविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशासकीय क्षेत्रात १६ वर्षे मी काम करत आहे, या काळात मला दोन किंवा तीन व्यक्ती भेटले. ज्यांच्याकडून कामाच्या प्रती प्रामाणिकपणा काय असतो हे मी शिकलो. त्यातील एक म्हणजे महेंद्र कोंडे हे आहेत, असे मत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा… पेट कॉर्नर असूनही अस्वच्छता; शहरातील पाळीव श्वानप्रेमींनी जागरुकता बाळगण्याचे आवाहन

ते म्हणाले, महापालिका ही कामाची अशी जागा आहे, की इथे काम करणाऱ्याचे मनोबल किती दिवस टिकेल याची हमी नाही. कारण ही जागा त्यांचे मनोबल खचवण्याचे काम करत असते. याबाबतीत महेंद्र कोंडे यांचे मला खरचं कौतुक वाटते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कवी – लेखकांनी पुस्तक लिहिण्यासह त्याच्या विक्रीवरही लक्ष दिले पाहिजे. तेव्हाच ते पुस्तक सर्वांपर्यंत पोहोचेल असे मत उद्याोजक व लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी व्यक्त केले.