नवी मुंबईमध्ये डेंग्यूसारख्या साथीचे आजार बळावत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये १४० डेंग्यू संशयित रुग्ण होते, यंदा मात्र २३ ऑगस्टपर्यंतच १३२ रुग्ण आढळे आहेत. ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयात तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागली असून खासगीमध्ये डेंग्यू संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सध्या हवामान बदलाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उष्ण – दमट हवामान, पावसाळा यामुळे हवा दूषित होऊन श्वसनाचे विकार जडत आहेत. त्याचबरोबर डेंग्यू, मलेरिया, आजारदेखील बळावत आहेत. महापालिका या आजारांना अटकाव आणण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : पामबीच मार्गावर बेकायदा पार्किंग, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक समस्या

रुग्ण संशोधक कारवाई, डास उत्पत्ती शोध मोहीम, फवारणी, धुरीकरण, इत्यादी उपाययोजना केल्या जातात. मात्र तरीदेखील बऱ्याच ठिकाणी डास उत्पती आढळते, परिणामी डेंग्यू, मलेरिया आजार बळावतात. यंदा डेंग्यू सदृश रुग्णांत वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये शहरात १४० संशयित तर ७ जणांना अधिकृत लागण झाली होती. यंदा ऑगस्ट महिन्यात २३ तारखेपर्यंत १३२ संशयित डेंग्यू रुग्णांची नोंद महापालिका रुग्णालयात झाली आहे. खासगी रुग्णालयात डेंग्यू सदृश्य रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत असल्याचे समोर येत आहे. मात्र महापालिकेकडे खासगी रुग्णालयातील रुग्णांची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

हेही वाचा – मोरा बंदरात मच्छिमारांची लगबग अन् नौकांची दुरुस्ती सुरू, नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होत असल्याने खोल समुद्रात जाणार नौका

नेरूळ सेक्टर ४४ मधील एका सोसायटीतील एकाच इमारतीत ८ मुलांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ बळावत असल्याने नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.