दोन वर्षांत ४८४ गुन्ह्य़ांची नोंद; फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण सर्वाधिक

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत ४८४ अपहरणांच्या गुन्ह्यंची नोंद झाली असून ९९ टक्के गुन्हे हे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे आहेत. यात कुटुंबीयांची नाराजी किंवा प्रेमात फूस लावून पळून गेल्याच्या सर्वाधिक घटना आहेत. विशेष म्हणजे या घटना सर्वसामान्य कुटुंबीयांत घडत असून पालक व मुलांचा सवांद कमी होत असल्यामुळे हे होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

१८ वर्षांखालील मुला-मुलींचे बेपत्ता होण्याविषयी थेट अपहरणाचा गुन्हा नोंद करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मुले-मुली विविध कारणांनी घरातून निघून जातात. यात प्रेम प्रकरणे, फूस लावून पळवून नेणे, पालकांशी वाद, अभ्यासाचा दबाव, शैक्षणिक अपयश आदी कारणांचा समावेश असतो. नवी मुंबईत  २०१९ मध्ये अपहरणाचे असे ३३३ गुन्हे नोंद झाले असून यातील ३०८ गुन्हे उकल झाले आहेत.

तर २०२० मध्ये १८७ गुन्ह्यंची नोंद झाली असून १३३ गुन्ह्यंची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात पैशांसाठी वा अन्य काही मागण्यांसाठी एकाही जणाच्या अपहरणाची नोंद झालेली नाही. हे सर्व गुन्हे अल्पवयीन मुले- मुली घरातून बेपत्ता होण्याबाबतच आहेत.

संवाद कमी पडतो..

याबाबत अधिक माहिती देताना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी सांगितले की, पालकांशी संवाद हेच मुख्य कारण आहे. मुलांशी पालकांनी मोकळेपणाने संवाद सााधला तर पाल्यही आपल्या मनातील प्रश्न बोलून दाखवतात. त्यातून मार्ग काढला जाऊ  शकतो. मात्र हा संवाद हरवत असल्याने मुले हे पाऊल उचलतात.

टाळेबंदीतही ५४ घटना

२०२० या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अपहरणाच्या १८७ गुन्ह्यंची नोंद  झाली असून यातील १६६ गुन्हे उकल झाले आहेत. यात मार्च ते सप्टेंबर या टाळेबंदी दरम्यान ५४ गुन्हे घडले आहेत. यात मे महिन्यात फक्त दोन तर ऑक्टोबरमध्ये २९ अपहरणाच्या गुन्ह्यंची नोंद झाली आहे.