माहितीसाठी अॅप; महाविद्यालयांवर जाळे घट्ट करणार
नवी मुंबई : मुंबईनंतर नवी मुंबईत वाढलेल्या अमली पदार्थाच्या सेवनावर अंकुश लावण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. जनतेला अमली पदार्थाच्या विक्री ठिकाणांची माहिती सहज देता यावी आणि या व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला मदत करता यावी यासाठी एक मोबाइल अॅप विकसित करण्यात येणार आहे.
नवी मुंबई हे पुण्यानंतर शैक्षणिक पंढरी म्हणून उदयास आली असून अमली पदार्थ विकणाऱ्यांनी या महाविद्यालयांवर जाळे घट्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
सिने अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर अमली पदार्थ पथकाने चित्रपटसृष्टीतील अनेकांवर कारवाई केली आहे. मुंबईतील सिनेसृष्टीत फोफावलेले हे अमली पदार्थ सेवनाच्या व्यसनावर नवी मुंबईत वेळीच निर्बध आणल्यास भावी पिढी या व्यसनापासून दूर राहील असे प्रयत्न नवी मुंबई पोलीस करीत असून सह आयुक्त डॉ. शेखर पाटील यांनी यासाठी आयुक्त बिपिन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एक आराखडा तयार केला आहे.
त्यानुसार अमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेतला जात असून यापूर्वी व्यसनाधीन झालेले तरुण, त्यांचे पालक, महाविद्यालयाशी संवाद साधला जात आहे. शहरात अमली पदार्थ विक्री होत असलेल्या ठिकाणांची तात्काळ माहिती पोलिसांनी देता यावी त्याचप्रमाणे व्यसनाधीन झालेल्या तरुणाईला या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत केली जाणार आहे.
नवी मुंबईत पाच वैद्यकीय महाविद्यालयासह, पंधरा अभियांत्रिकी व चारशेपेक्षा जास्त खासगी विद्यालये आहेत. या विद्यालयातील तरुणांना या व्यसनाकडे वळविण्यासाठी अमली पदार्थ विक्रेते कार्यरत असतात. करोनाच्या काळात या विक्रेत्यांनी व्यसनाधीन तरुणांना घरपोच सेवा देण्याचादेखील प्रयत्न केल्याचे समजते.