नवी मुंबई : आप्पासाहेबांचे मला सदैव मार्गदर्शन लाभते . त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. चांगले काम करण्याची प्रेरणा व चांगले विचार बैठकीच्या माध्यमातून मिळतात. जेव्हा मलाही ताण येतो त्या वेळेला मी आप्पासाहेबांचे मार्गदर्शन घेतो. त्यांच्या निरूपणातून चांगले विचार मिळतात सर्वसामान्यांना मदत व दिशा देण्याचे ते काम करतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला  विद्यापीठाने सचिन धर्माधिकारी यांना डी. लीट्. ही पदवी बहाल केली. या निमित्त वाशी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी व्यासपीठावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीकांत शिंदे, पूनम महाजन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनोद टीब्रेवाला उपस्थित होते.

नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची किंमत अनमोल आहे, त्यांच्या विचारांचे व ज्ञानाचे खरे विद्यापीठ रेवदंडा येथे असून लवकरच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आपले मन स्वच्छ असेल तर आपल्याला सर्व स्वच्छ दिसते ही जाणीव आप्पासाहेबांनी मला करून दिली आहे. त्यांच्यातूनच मला काम करण्याची प्रेरणा मिळते. आपण समाजाला काय देणार व राष्ट्राला काय देणार ही शिकवण श्री सदस्यातून प्राप्त होते. सरकार जिथे पोहोचत नाही तिथे श्री सदस्य पोहोचतात हीच या श्री सदस्यांची मोठी किमया आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार हा श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याच्या भावना पद्मश्री आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांनी याप्रसंगी काढले.  नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे सचिन धर्माधिकारी यांनी सांगत हा गौरव खऱ्या श्री सदस्यांचा असल्याचा नमूद केले. या कार्यक्रमाला श्री सदस्यांनी मोठी गर्दी केली होती.