पनवेल – पनवेलमधील बस प्रवाशांना चोरट्यांचा सामना करून प्रवास करावा लागत आहे. गेल्या महिन्यात महिलेचे ११ लाखांचे दागीने बस प्रवासादरम्यान चोरीस गेल्याची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी एका अभियंत्या प्रवासीला अलिबागमध्ये जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या अंगावरील दागीने हिसकावून चोरी केल्याची घटना उजेडात आली. बसमधील गर्दीच्या आडून होत असलेल्या चोरी रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी रांगेचे व्यवस्थापन केल्यास अशा घटना टळू शकतील.
रोडपाली सेक्टर २० येथील समुद्धी हाईट्स या इमारतीमध्ये राहणा-या ४२ वर्षीय अभियंत्याने पनवेल शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये ते शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सूमारास पनवेल बसआगाराच्या अलिबाग येथे जाण्यासाठी नेमलेल्या फलाटावर उभे होते. अलिबागला जाणारी बस आल्यावर इतर प्रवाशांप्रमाणे पिडीत अभियंता सुद्धा बस पकडण्यासाठी गर्दीत शिरले. बसमध्ये चढताना झालेल्या गोंधळामध्ये पुढील आणि मागील बाजूस धक्का देणा-या काही संशयीत प्रवाशांनी अभियंत्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या सोनसाखळीचे बाजारमुल्य ७० हजार रुपये होते.
बसमधील गर्दीच्यावेळी प्रवाशांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. पोलीस आणि राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी सूरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. बस आगारात गर्दी टाळण्यासाठी नियोजन करावे आणि चोरांवर अंकुश राहण्यासाठी साध्या वेशातील पोलीसांचे गर्दीच्यावेळी बस आगारात नेमणूक करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
