जुईगाव
रायगड जिल्ह्य़ातील ग्रामस्थांचे झालेले स्थलांतर आणि या ठिकाणी झालेले पुनर्वसन यामुळे हे गाव विस्थापितांचे गाव म्हणूनच ओळखले जाते. मात्र रायगड जिल्ह्य़ातील आगरी समाजात येथील आगरी समाजाशी रोटीबेटीचा व्यवहार चालत असल्याने या मजुरांना येथील रहिवाशांना सामावून घेण्यात अडचण आली नाही.
मिठागरांवर मोलमजुरी करण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील विविध गावांतून आलेल्या ग्रामस्थवजा मजुरांचे गाव म्हणजेच जुईगाव. जईनगर रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा सिडकोने लवकर विकास केला. त्यामुळेच सानपाडा रेल्वे स्थानकानंतर शिरवणे, सारसोळे या गावाची नावे न देता जुई गावावरून जुईनगर हे नाव देण्यात आले आहे. जुई खाडीवरून या गावाला जुईनगर हे नाव पडल्याचे बोलले जाते. विनायक भावे यांच्या मिठागरावर काम करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या राहण्याची सोय म्हणून जवळच्या माळरानावर १९१४ मध्ये ह्य़ा गावाची मुहूर्तमेढ रोवल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अतिशय शांत, संयमी आणि कष्टाळू लोकांचे गाव म्हणून जुईगावकडे पाहिले जाते. वाशी उपनगराला खेटून असलेल्या जुहूगावाशी नामसंदर्भ असलेले हे ठाणे बेलापूर पट्टीतील एका पाडय़ापासून तयार झालेले हे एक छोटे गाव आपले अस्तित्व राखून आहे.
पूूर्वे बाजूस शिरवणे व कुकशेत गावांची सीमा तर पश्चिम बाजूस खाडी आणि त्याला लागून असलेले विस्तीर्ण मिठागर. दक्षिण बाजूस सारसोळे गाव तर उत्तर बाजूस सानपाडा गाव अशा चार गावांच्या मधोमध सहा एकर जागेवर वसलेली मजुरांची लोकवस्ती म्हणून वसविण्यात आलेले हे गाव नंतर येथील ग्रामस्थांचे गाव झाले. ठाणे बेलापूर पट्टीतील आगरी कोळी समाजाच्या चालीरीती आत्मसात करणाऱ्या या गावाने शिरवणे गावाला नेहमीच मोठा भाऊ मानले आहे. नवी मुंबईत सध्या ज्या ठिकाणी वाशी, नेरुळ, सानपाडा, एपीएमसी, तुर्भे ही उपनगरे आहेत. त्या ठिकाणी भावे आणि कांगा शेठ या दोन जमीनदारांची मिठागरे भाडेपट्टीने विकसित केली जात होती. त्यासाठी लागणारा मजूर वर्ग हा जवळच्या पनवेल, उरण, आणि ठाणे जिल्ह्य़ांतून आणला जात असे. रायगडच्या अशाच भागातून आलेल्या भोईर, मढवी, पाटील आणि खारकर यांच्या प्रथम चार कुटुंबांची नंतर १८ कुटुंबे झाली.
सारसोळे, सानपाडा, शिरवणे आणि वाशी येथील अनेक मजूर या मिठागरावर मीठ तयार करण्याच्या कामात वाकबर होते. या स्थानिक कामगारांत नंतर रायगड जिल्ह्य़ातील काही कुटुंबे येऊन काम करू लागली. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी खाडी पार करून हे मजूर पनवेल, उरण भागांतील आपल्या घरी जात होते. त्या वेळी त्यांच्या निवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मिठागरासाठी डोंगर नदी नाल्यातून येणारे पाणी थेट मीठ आगारात जाऊ नये यासाठी तुर्भे ते नेरुळ दरम्यान एक लांबलचक बांध घालण्यात आला होता.
या बांधाच्या पश्चिम बाजूस मिठासाठी छोटी छोटी आगार तयार केली जात होती, मात्र पूर्वे बाजूस पावसाळ्यातील पाणी येऊन काही नाले तयार झाल्याने पाण्याची तळी निर्माण झाली होती. त्यामुळे या भागात बाराही महिने हिरवळ दिसू लागली. एका बांधामुळे तयार झालेल्या खोऱ्यामुळे शिरवणे गावाच्या पायथ्याशी असलेल्या माळरानावर रायगड जिल्ह्य़ातून येणाऱ्या मजुरांसाठी लोकवस्ती तयार करण्यास सावकारांनी संमती दिली. त्यामुळे या माळरानावर जुईगाव तयार झाले. एपीएमसीमधून नेरुळच्या खाडीकडे जाणाऱ्या एका मोठय़ा खाडी प्रवाहाला येथील रहिवाशी जुईखाडी म्हणत होते. तेच नाव या गावाला नंतर देण्यात आले. शहरी भागात एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कडेला काही काळाकरिता लोकवस्ती तयार होत असते. ही लोकवस्ती नंतर हटवली जाते किंवा ती जबरदस्तीने त्याच ठिकाणी राहून जाते.
जुईगावाची दंतकथा काहीशी अशीच आहे. ही जागा नंतर सावकारांनी आजूबाजूच्या गावातील मारवाडी समाजाला विकली. त्यांच्याकडून शिरवणे येथील पाटील समाजाने ही जमीन घेतली आणि जुईगावातील मजुरांना ही जमीन शेतीची मशागत करायला दिली. त्यानंतर कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर हा कूळकायदा या मजुरांना लाभदायक झाला. त्यामुळे जुईगावाचे अस्तित्व कायम राहिले. रायगड जिल्ह्य़ातील ग्रामस्थांचे झालेले स्थलांतर आणि या ठिकाणी झालेले पुनर्वसन यामुळे हे गाव विस्थापितांचे गाव म्हणूनच ओळखले जाते. मात्र रायगड जिल्ह्य़ातील आगरी समाजात येथील आगरी समाजाशी रोटीबेटीचा व्यवहार चालत असल्याने या मजुरांना येथील रहिवाशांना सामावून घेण्यात अडचण आली नाही. गावात दोन विहिरी होत्या, पण त्यांना खारट पाणी लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांना हर्डिलिया कंपनीत असलेल्या एका बागेतील विहिरीवर अवलंबून राहावे लागत असे. याच वेळी सारसोळे व शिरवणे हे दोन भावबंध गावातील विहिरीदेखील या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत होत्या. शेती, मिठागरावरील मजुरी आणि मासेमारी हे तीन व्यवसाय या गावातील ग्रामस्थांचेही ऋतुनियमानुसार बदलत होते.
कष्टाळू असलेल्या या गावातील काही ग्रामस्थ मासेमारीसाठी खाडीत दररोज जाऊन ती मासळी ठाणे व पनवेलच्या बाजारात विकण्यास नेत होते. शिक्षणाच्या बाबतीत परावलंबी असलेल्या जुईगावातील काही तरुण शिरवणे गावात प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जात होते. त्यानंतरच्या उच्चशिक्षणासाठी तुर्भे किंवा ठाण्यावर या गावातील विद्यार्थी अवलंबून होते. या प्रतिकूल परिस्थितीतही यशवंत भोईर हा पहिला तरुण पदवीधर झाला. आजूबाजूच्या चार गावाच्या ग्रुप ग्रामपंचायतीचा एक भाग असलेलल्या या गावातील हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील व रामा शंकर मढवी हे दोन तरुण सदस्य शिरवणे गावातील ग्रामपंचायतीत सदस्यपद सांभाळत होते. ही या गावाची राजकीय पाश्र्वभूमी. नेहमीच याचकाच्या भूमिकेत असलेल्या या गावात चांगल्या प्रकारे एकोपा सांभाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याच ग्रामस्थांच्या पोटावर लाथ मारण्याचा म्हणजेच आगार तोडण्यात आले तेव्हाच हे संपूर्ण गाव पेटून उठले होते. त्या वेळी गावात झालेल्या राडय़ामुळे दोन तरुणांना नंतर तुरुंगात जावे लागले होते. हाच काय तो या गावात अशांततेचा काळ होता. या गावाचा सिडकोने लवकर विकास हाती घेतला. त्यामुळे चारही बाजूने नागरीकरण लवकर झाले असून त्यात गाव आता हरवून गेले आहे. रेल्वेच्या एका स्थानकाला सानपाडा नाव दिल्यानंतर दुसऱ्या स्थानकालाही सानपाडा नाव देण्याच्या सिडकोच्या कृती विरोधात या गावातील ग्रामस्थांनी आवाज उठविला आणि वाशी-पनवेल मार्गावरील एका स्थानकाला जुईनगर नाव देण्यात आले. सानपाडा येथील सेक्टर २३ म्हणजेच आजचे जुईगाव आहे.
सत्तरच्या दशकात या गावात ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्यानंतर १९७९ मध्ये गावात विजेचा पहिला दिवा लागला. मिठागरे गेल्याने ग्रामस्थाच्या हातचे काम गेले होते. त्यामुळे शेती आणि मासेमारी यावरच अवलंबून असणाऱ्या गावातील तरुणांनी नंतर हर्डिलिया, लंडन पिल्सनर, क्रिसेन्ट वॉल या कारखान्यांत नोकऱ्या केल्या; मात्र मासेमारीवर या गावातील ग्रामस्थांचा जास्त भर होता. कारखान्यात आठ तास खपून दोन ते तीन रुपये हाती पडण्यापेक्षा स्वत:चा मासेविक्रीचा व्यवसाय करण्यावर या गावातील ग्रामस्थांना अधिक लक्ष दिले होते. कूळ कायद्यातील मिळालेल्या जमिनीमु़ळे सिडकोने संपादित केलेल्या जमिनीचा काही मोबदला ग्रामस्थांच्या हाती पडला आणि गावाचे दिवस बदलू लागले. सिडकोचे आगमन हाच या गावातील ग्रामस्थांच्या परिवर्तनाचा दिवस मानला गेला आहे.