खैरणे

नवी मुंबईत अर्थात जुन्या बेलापूर पट्टीत संपूर्ण मुस्लीम लोकसंख्या असलेली दोनच गावे आहेत. एक बेलापूरजवळील शाहाबाज आणि दुसरे ठाणे-बेलापूर मार्गावरील खैरणे. त्यात शाहाबाजमध्ये बोटावर मोजण्याइतके आगरी कोळी बांधव निदान दिसून येतील, मात्र खैरणे हे संपूर्ण गाव सुन्नी मुस्लीम समाजाचे आहे. विशेष म्हणजे चालीरीती, रूढी, परंपरा जपणाऱ्या या गावात चार दिशांना चार पीर दर्गा असून गावाचे रक्षण करणारे हे दर्गा अनेक ग्रामस्थांचे प्रेरणास्थान आहेत.

नवी मुंबईतील पहिली जुम्मा मशीद या गावात आहे. पंचक्रोशीतील सर्व मुसलमान कालपरवापर्यंत याच गावात नमाज अदा करण्यासाठी येत होते. चारही बाजूंनी शेती, जंगल आणि त्यात असलेल्या खैराच्या झाडांमुळे या गावाला खैरणे असे नाव पडले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे, पण त्याला ठोस असा पुरावा नाही. गावाला सर्वात जुना मोघलकालीन इतिहास असून अरेबिक भाषेतील काही शिलालेख गावाच्या पोटात गायब झाल्याचा अंदाज आहे. पूर्वेला असलेल्या दाऊद शाह दग्र्याजवळील हौदाला बसविण्यात आलेले दहा-पंधरा फुटांच्या दगडांवरून ही बाब अधोरेखित होत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या खैरणे एमआयडीसीच्या समोर हे संपूर्ण मुस्लीम लोकवस्ती असलेले खैरणे गाव आहे. वास्तविक महसुलाच्या दृष्टीने खैरणे बोनकोडे हे एकच गाव मानले गेले आहे; पण खैरणे गावाला एक स्वतंत्र इतिहास आहे. गावाच्या पूर्वेबाजूस दाऊद शाह यांचा दर्गा आहे. ह्य़ाच दर्गाजवळ एक हौद आणि विस्र्तीण असा तलाव होता. तलाव आता शहरीकरणात गायब झाला आहे. त्याच्यापल्याड विस्र्तीण शेती आणि डोंगररांगा. पश्चिम बाजूस आणखी एक कातीर शाह बाबा दर्गा आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या बोनकोडे गावातील जुन्या घरासमोर हा पीर दर्गा आहे. बोनकोडे गावातील नवदाम्पत्य या दग्र्याला नारळ वाहिल्याशिवाय आजही गावात प्रवेश करीत नाही. हिंदू आणि मुस्लीम समाजातील ग्रामस्थ या पीर बाबाच्या दग्र्यासमोर सारखेच नतमस्तक होतात. दक्षिण बाजूला गैबन शाह यांचा दर्गा आहे, तर जेथे आज घणसोली रेल्वे स्थानक आहे त्या स्थानकाच्या बाहेर असलेल्या सावली गावाच्या सीमेवर मेहमूद शाह यांचा जुना दर्गा आहे. विशेष म्हणजे या दर्गाचे एके काळी हिंदू व मुस्लीम दोघेही देखभाल आणि दिवाबत्ती करीत होते. नंतर तयार झालेल्या व्यवस्थापन समितीतही कोपरखैरण्यातील काही हिंदू ग्रामस्थ ट्रस्टी म्हणून होते. या पीर दर्गाला दिवाबत्ती केल्यानंतरच या परिसरात असलेल्या शेतीवाडीच्या कामाला सुरुवात केली जात होती. पूर्व बाजूला दर्गा असलेले दाऊद शाह येथील खूप मोठे जमीनदार असल्याचे सांगितले जाते. तीन पटेल कुटुंबांच्या विस्तारातून ह्य़ा गावाची निर्मिती झाली आहे. गावाच्या चारही बाजूंनी असलेल्या सातशे ते आठशे एकर जमिनीचे हे पटेल कुटुंब सावकार खोत होते. त्यामुळे खानपान, राहण्यात या गावाची ऐट काही औरच होती. शेतीवर काम करण्यासाठी आजूबाजूच्या गावांतील अनेक गरीब आगरी कोळी दलित समाज खैरणे गावात येत होते.

त्यातील दलित समाजाने नंतर उत्तर बाजूस आपली स्वतंत्र वसाहत तयार केली. विशेष म्हणजे पंचक्रोशीत असलेली प्रतिष्ठा येथील गावातील इब्राहिम पटेल, अब्दुला पटेल, शमसुद्दीने पटेल, हसन मिय्या पटेल यांसारख्या रहिवाशांना पोलीस पाटलांचा मान देऊन गेली. आजूबाजूच्या चार गावांचे पोलीस पाटील याच गावातील होते. कालांतराने कोकणातून आलेल्या काही मुस्लीम बांधवांनीही या गावाचा आश्रय घेतला. साठ-सत्तर लोकांची वस्ती असलेल्या या गावाने नंतर सातशे ते आठशे लोकसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

संपूर्ण बेलापूर पट्टीत एकमेव मस्जीद असलेल्या या गावात पूर्वी बेलापूरपासून मुस्लीम समाज नमाज अदा करण्यास येत होता. सुफी संत परंपरा सांभाळणारे हे एकमेव गाव शतप्रतिशत सुन्नी मुस्लीम समाजाचे आहे. इतर धर्म, जात, प्रांतांचा द्वेष करण्याचे संस्कार या गावात नाहीत. गावातील ग्रामस्थ आजही हिंदू सणांसाठी बोनकोडे गावात आवर्जून हजेरी लावतात, तर बोनकोडे गावातील गावकरी दोन इदी आणि उरुसाला खैरणे गावात हक्काने येतात. हा बंधुभाव नवी मुंबईतील दोन गावे वगळता इतर ठिकाणी फार क्वचित पाहण्यास मिळतो. अनेक व्यवसायांत या बोनकोडे खैरणे गावातील ग्रामस्थांची भागीदारी आहे. शेती आणि त्यावर अवलंबून असणारे जोड व्यवसाय हे या गावातील ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधन होते. आजूबाजूच्या गावांचे गवत खरेदी करून ते ठाण्यात विकण्यास नेण्याचा एक-दुसरा व्यवसाय या गावातील तरुणांचा होता. गावाच्या मधोमध एक कोंडवाडादेखील होता.

शेतीमुळे दूधदुभते मोठय़ा प्रमाणात असल्याने हरवलेली गाईगुरे या कोंडवाडय़ात आणून बांधली जात होती. शिक्षणाचे आणि गावाचे तसे वाकडेच, त्यामुळे गावात उर्दू शाळा असण्याचा प्रश्नच नव्हता. कुराण आणि मुस्लीम रीतिरिवाज मदरसामध्ये शिकवले जात होते; पण पारंपरिक बेडय़ात अडकलेल्या गुलाम हुसेन फक्की, आयुब महम्मद अमीन पटेल आणि अजीज अहमद पटेल या तीन तरुणांनी ह्य़ा बेडय़ा तोडल्या आणि बोनकोडे येथील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तुर्भे येथील सामंत विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्या वेळी या तीन हुशार विद्यार्थ्यांचे चांगलेच कौतुक गावात झाले.

बोनकोडे गावाने तर या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. शिक्षणाची मळवाट तयार करण्यास हे तीन विद्यार्थी कारणीभूत ठरले आणि गावातील अनेक विद्यार्थ्यांनी नंतर उच्च शिक्षण पूर्ण केले, मात्र या तीन तरुणांना उच्च शिक्षण घेता आले नाही. तोपर्यंत हातातून जमीन गेल्याने या विद्यार्थ्यांनी एमआयडीसीतील काही कारखान्यांत नोकरी पत्करली. कौपरखैरणे, खैरणे, बोनकोडे, पावणे आणि कातकारी पाडय़ाची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या गावातून नंतर दोन सदस्य बिनविरोध पाठविले जात होते. शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा झेंडा हातात घेणारेही या गावात होते. त्यामुळे अलीकडच्या काळात काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्यही ग्रामपंचायतीत सामंजस्यपणाने पाठविले जात होते. बोनकोडे गावात होणाऱ्या विठ्ठल-रुखमाईच्या पालखी सोहळ्यानंतर दोन दिवसांनी गावात मोठा उरूस भरतो. चार दर्गावर चादर वाजतगाजत मिरवणुकीने सैंदल नेल्यानंतर गावात उरूस जत्रा जोरात साजरी केली जाते. चादर चढविण्याचा पहिला मान मुजावर कुटुंबाला आजही आहे. वर्षांतून येणाऱ्या दोन ईद, उरूस आणि ईद-ए-मिलादचे चार उत्सव गावात मोठय़ा धूमधडाक्यात साजरे केले जातात. १९७० मध्ये भिवंडीत झालेली हिंदू-मुस्लीम दंगलीची झळ या गावालाही पोहोचली होती. १७ तरुण व आजारी वृद्ध वगळता सर्व गावाने रातोरात गाव खाली करून समोरचा पारसिक डोंगर पार करून तळोजा ही दुसरी मुस्लीम वस्ती गाठली होती. काही दिवसांनी सर्व सुरळीत झाले; पण हा दिवस गावासाठी काळा दिवस मानला गेला आहे. गावात पूर्वी होणारा उरूस आणि त्यासाठी पंचक्रोशीतून येणारी मित्रमंडळी, जत्रा, गाणे, खेळ हे कार्यक्रमच या गावाच्या आनंदाचे दिवस मानले गेले आहेत. चार पीर दर्गा आणि दोन मस्जीद सुफी संत परंपरा मानणाऱ्या या गावात एकही ग्रामस्थ उपाशी राहात नाही, असा ठाम विश्वास या ग्रामस्थांचा आहे.