पनवेल – खारघर उपनगरात जुलै महिन्यात एका रात्री तब्बल ९ ठिकाणी झालेल्या घरफोडीनंतर खारघरच्या सूरक्षेविषयीचा प्रश्न पावसाळी आधिवेशनात भाजपच्या आमदारांनी मांडला. मात्र दोन आठवडे उलटले आणि आधिवेशन संपल्यानंतर पुन्हा खारघरमध्ये चोरटे सक्रीय झाले आहेत. १९ जुलैला एकाच दिवशी खारघर येथील सेक्टर १६ येथील साई शारदा सोसायटीमधील दोन घरफोड्यांमुळे पोलिसांच्या सूरक्षेयंत्रणे विषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घरफोड्यांमध्ये पावणेसात लाखांची चोरी झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी खारघर प्रकरणी लक्ष्य घालण्याची गरज असल्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.
३ ते ४ जुलैच्या रात्री खारघर परिसरात अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बंद घरांचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. तोंडावर मंकीकॅप आणि अंग पुर्ण झाकलेले वस्त्र तसेच हातामध्ये कोयता घेऊन ही टोळी इमारतीमध्ये शिरून बंद घरांना लक्ष्य करत होती. या चोरीमध्ये २० लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याविषयी विधिमंडळात आ. प्रशांत ठाकूर यांनी लक्ष्य वेधल्यानंतर खारघरच्या सूरक्षेविषयी पोलीस गांभीर्याने विचार करतील अशी अपेक्षा होती. मात्र दोन आठवड्यानंतर पोलीसांचा वचक वाढण्याएेवजी चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र आहे.
साई शारदा इमारतीमधील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार एका घरातून पावणेपाच लाखांचे आणि दूस-या घरातून दोन लाख आठ हजारांचे दागीने व रोखरक्कम चोरल्याची तक्रार पोलीस दफ्तरी नोंदवली आहे. खारघर पोलीस ठाण्यात अपुरे पोलीस कर्मचारी आणि सीसीटिव्ही कॅमेरे शहरात अजून लावल्यास चोरटे पकडणे पोलीसांना सहज शक्य होण्याचा मुद्दा विधिमंडळात मांडण्यात आला होता. सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या चोरट्यांचा शोध पोलीस लावू शकले का, हा प्रश्न सुद्धा आ. ठाकूर यांनी उपस्थित केला होता. खारघर उपनगरात पतीपत्नी हे दोघेही नोकरीनिमित्त घराला कुलूप लावून घराबाहेर जाणारी शेकडो कुटूंबिय आहेत. दिवसा व रात्री कुलूप बंद घरांना चोरटे लक्ष्य करत असल्यास अशा चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीसांच्या विविध पथकांनी वेगळे तंत्र वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.