पोलीस दल आधुनिकीकरण अंर्तगत नवी मुंबईत १२०० सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय असमर्थ ठरल्याने नवी मुंबई पालिकेने शहरात सर्व ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्याच्या घेतलेल्या जबाबदारीला कधी सुरुवात होणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव देऊन आता चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी सत्ताधारी यावर निर्णय घेत नाहीत असे दिसून येत आहे.
११० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला पालिकेने यंदा ८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वी पालिकेने २६८ सीसी टीव्ही कॅमेरे लावले असून सहा वर्षांनंतर ते कुचकामी ठरले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर महत्त्वाच्या शहरांच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईअगोदर नवी मुंबई पालिकेने शहरातील मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसी टीव्ही कॅमेरे लावून अर्धे शहर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखेखाली आणले आहे.
याचा फायदा नवी मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्य़ांची उकल करताना झालेला आहे. राज्यातील पोलीस दल ही सर्व १२०० ठिकाणे नवी मुंबई पोलिसांनी निश्चित केलेली आहेत. सिडकोने दक्षिण नवी मुंबई भागात २९४ सीसी टीव्ही लावले असून ६०० सीसी लावण्याची तरतूद आहे. स्मार्ट सिटी अंर्तगत या सर्व सीसी टीव्ही कॅमेऱ्यांसाठी एक नियंत्रण कक्ष बेलापूर येथील रेल्वे स्थानकावरील सिडकोच्या जागेत तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई पालिका प्रशासनाने तयार केलेला हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यथावकाश त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे शहर सीसी टिव्ही कॅमेरांच्या देखरेखेखाली येणार आहे. हे कॅमेरे पालिका क्षेत्रातच लावले जाणार असून त्याचा फायदा अनेक गुन्हयांची उकल करण्यासाठी पोलिसांना होत आहे. जुने सीसी टिव्ही आता कमकुवत झालेले आहेत. -रविंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका