येथील सिडकोकडून विकसित करण्यात येत असलेल्या द्रोणागिरी नोड या नव्या शहरा शेजारीच सिडको कडून संपादित न झालेल्या चाणजे करंजा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी भूमाफिया सक्रिय झाले असून शेजारीच 8 टेन10 लाख रुपये गुंठा जमिनीचा दर असतांना निम्म्या दराने या जमिनीची खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी सावध होत आपली फसवणूक होऊ न देता जमिनीला योग्य दर मिळे पर्यंत जमिनीची विक्री करू नये असे आवाहन पंचायत समितीच्या सदस्यांनी केले आहे.

सिडकोने नवी मुंबई शहारा साठी जमिनी संपादित करीत असतांना उरण मधील चाणजे,केगाव,जासई या भागातील जमिनी संपादित केलेल्या नाहीत. त्यामुळे या जमीनीला सध्या घर बांधणी व व्यवसायासाठी मागणी आहे. यातील करंजा मधील जमिनी या समुद्र किनाऱ्यावर व सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतून विकसित होणाऱ्या द्रोणागिरी नोड शेजारी आहेत. त्यामुळे या जमिनीचे महत्व अधिक वाढले आहे. या जमिनीना लागून असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीच्या एका गुंठ्याला 8 ते 10 लाख रुपयांचा दर मिळत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : जीर्ण इमारतीत व्यापाऱ्यांचा जीव मुठीत धरून व्यवसाय!

मात्र करंजा येथील जमीनी अविकसित असल्याच्या नावाखाली येथील जमानीला 3 ते 4 लाख रुपये इतका कमी दर दिला जात असल्याची माहिती करंजा येथील शेतकरी विनायक पाटील यांनी दिली आहे. यापूर्वीही करंजा परिसरातील जमिनी कवडीमोल दर देऊन खरेदी करण्यात आल्या होत्या त्याची पुनरावृत्ती होत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या या सोन्याच्या दरातील जमिनी कवडीमोल दरात न विकता त्या राखाव्यात असे आवाहन उरण पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर यांनी केले आहे.