नवी मुंबई : बेलापूर विभागातील शहाबाज गावात झालेल्या दुर्घटनेत इंदिरा निवास ही अनधिकृत इमारत कोसळली होती. त्यात तीन जणांचा बळी गेला होता. दुर्घटनेनंतर इमारतीचा विकासक महेश कुंभार व जागा मालक शरद वाघमारे दोघेही फरार होते. त्यातील जागा मालक शरद वाघमारे याला अटक केली असून विकासक कुंभार अद्याप फरार आहे. त्याचा अद्याप शोध सुरू आहे. शहाबाज गावात दुर्घटना झालेल्या इमारतीतमधील ५२ जण सुखरूप बाहेर पडले होते. पालिकेने याच इमारतीच्या बाजूलाच असलेले या इमारतीच्या जागा मालकानेच उभारलेले बेकायदा सात गाळेही तोडले आहेत. हेही वाचा.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात ४०० सुरुंग स्फोटाला ग्रामस्थांचा विरोध, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्फोटांचे नियोजन दुर्घटना घडल्यानंतर बेकायदा इमारतीचा विकासक महेश कुंभार व जमीन मालक यांच्यावर एनआरआय पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुर्घटनेतील जमीन मालकाला अटक केली असून विकासक अद्याप फरार आहे, अशी माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी दिली.