पूनम सकपाळ

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्च-एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर लाल मिरची तसेच गरम मसाले दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु परराज्यातही पडलेल्या अवकाळी पावसाने लाल मिरची भिजल्याने दर्जावर परिणाम झाला असून बाजारात लाल मिरचीची आवक घटली आहे. मिरचीचा दर्जा खालावल्याने दरातही १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे.

मार्चनंतर कडक उन्हाळा सुरू होताच गृहिणींची मसाला बनविण्यासाठी लाल मिरची व गरम मसाले घेण्याची लगबग सुरू होत असते. वर्षभर ठेवणीचा मसाला बनविण्यासाठी गृहिणींची लगबग असताना ऐन हंगामात अवकाळी पावसाने निराशा केली आहे. एपीएमसी बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून लवंगी, बेडगी, पांडी, काश्मिरी मिरची दाखल होते. मागील आठवड्यात कर्नाटक, आंध्र प्रदेश येथेही अवकाळी पाऊस पडल्याने लाल मिरच्या भिजल्या आहेत. या भिजलेल्या मिरच्या उन्हात सुकवल्याने त्यांचा रंग उडून जात आहे, शिवाय चवीवरही परिणाम होत आहे. मार्चमध्ये एपीएमसी बाजारात लाल मिरचीच्या अडीच ते तीन लाख गोणी दाखल होत होत्या, परंतु पावसाने उत्पादनाला फटका बसला असून, आवक कमी होत आहे.

हेही वाचा >>>दक्षिण आशियाई लॉन टेनिस स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र या आठवड्यात बाजारात १ लाख ५० हजार ते १ लाख ८० हजार गोण्यांची आवक झाली आहे. तसचे बाजारात मोठे ग्राहक नसून घरगुती मसाला बनविण्यासाठी मागणी आहे, त्यामुळे आवक कमी असूनही दर गडगडले आहेत, अशी माहिती मसाला व्यापाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे लवंगी मिरचीचे दर १० टक्क्यांनी तर बेडगी मिरचीचे दर २० टक्क्यांनी घसरले आहेत. आधी प्रतिकिलो लवंगी मिरची २८० रुपयांनी विक्री होत होती, मात्र आता २५०-२६० रुपयांवर विक्री होत आहे. बेडगी मिरची ६००-६५० रुपयांवरून ४५०-५०० रुपयांवर, तर आधी ८०० रुपयांनी विक्री होणारी काश्मिरी मिरची आता ६००-७०० रुपयांनी विक्री होत आहे.

एपीएमसी बाजारात अवकाळी पावसाने लाल मिरचीची आवक घटली आहे, शिवाय दर्जाही खालावला आहे. बाजारात ग्राहक नसल्याने दरात १०-२० टक्के घसरण झाली आहे.-अमरीश बारोट, घाऊक व्यापारी, मसाला बाजार एपीएमसी