नवी मुंबई पालिकेचा उत्पन्नवाढीचा प्रयत्न

संतोष जाधव

नवी मुंबई :  महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील सर्व मालमत्तांचे ‘लाइट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेंजिंग टेक्नॉलॉजी’ अर्थात लिडार सर्वेक्षण केले जाणार असून याचा श्रीगणेशा मार्चपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्तांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालमत्ता कराद्वारे होणाऱ्या उत्पन्नामध्येही वाढ होणार आहे.  पालिकेच्या बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील लिडार सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला होता. पालिकेच्या उत्पन्नवाढीच्या पूर्तीचे हे सर्वेक्षण पहिले पाऊल ठरणार आहे. पालिकेने मार्चअखेर  ६०० कोटींचे लक्ष्य ठेवले असून २०२२-२३ मध्ये मालमत्ता करातून ८०४ कोटींचे लक्ष्य ठरवले आहे. लिडार सर्वेक्षणाची सुरुवात काही दिवसांतच सुरू करण्याचे पालिकेने  निश्चित केले आहे.

अशा पद्धतीने सर्वेक्षण

  • सर्वेक्षणासाठी सुमारे २२ कोटींचा खर्च 
  • ३६० अंशात विस्तीर्ण सर्वेक्षण मोबाईल मॅपिंग सिस्टम वापरून ग्राऊंड स्तरावरील प्रतिमा प्राप्त होणार.
  • ग्राऊंड सर्वेक्षण व बेस मॅप अपडेट
  • एमआयएस डेटासह माहितीचे प्रमाणीकरण होणार
  • तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार फरक आढळणाऱ्या मालमत्तांचे फिजिकल सर्वेक्षण होणार आहे. वृक्ष, रस्ते लांबी-रुंदी, चौक, बसथांबे, रिक्षा स्टँड, रस्त्यावरील पादचारी वर्दळ यांसह इत्थंभूत माहिती मिळणार

पालिका मालमत्तांबरोबरच शहरातील सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होणार आहे. नागरी सुविधांसाठी लिडार सर्वेक्षणाचा फायदा होणार असून त्यातून छुप्या मालमत्ता समोर येणार आहेत.तसेच सर्व मालमत्ता करक्षेत्रात आल्याने पालिकेचे उत्पन्नातही निश्चित वाढ होईल.

  – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका