scorecardresearch

हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे ठार करणाऱ्या पती आणि सासूला जन्मठेप; ६० हजारांचा दंडही ठोठावला

लग्नानंतर काही महिन्यांनी नवरा, सासू आणि सासऱ्यांकडून ज्योतीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता.

हुंड्यासाठी विवाहितेला अमानुषपणे ठार करणाऱ्या पती आणि सासूला जन्मठेप; ६० हजारांचा दंडही ठोठावला
विवाहितेला जाळून मारणाऱ्या नवरा आणि सासूला जन्मठेप

घरासाठी पैसे दिले नाहीत म्हणून  विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळणाऱ्या पती आणि सासू या दोघांना पनवेल येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. निलेश रामकृष्ण म्हात्रे आणि मालती रामकृष्ण म्हात्रे अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोघांची नावे असून, त्यांनी ६ डिसेंबर २०१५ रोजी ज्योती हिरामण टावरी हिला जिवंत जाळून तिची हत्या केली होती.

हेही वाचा- मुंबईतील हॉटेलमध्ये ४० वर्षीय मॉडेलची आत्महत्या; मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

पेण तालुक्यातील रावे येथे राहणारी ज्योती हिरामण टावरी हिचा विवाह पनवेल तालुक्यातील कासारभाट येथे राहणाऱ्या निलेश म्हात्रे याच्याशी २ मे २०१५ रोजी झाला होता. विवाहानंतरचे काही दिवस मजेत गेले. मात्र. त्यानंतर काही आठवड्यातच घरासाठी पैसे मागणे सुरु झाले. यात सासू- सासरे आणि पती या तिघांनीही छळ सुरु केला. मात्र, ज्योती हिने माहेरुन पैसे आणण्यास नकार दिल्याने तिच्या सासरकडील मंडळींनी तिचा मानसिक, शारीरिक छळ सुरु केला होता. मात्र पैसे माहेरहून आणणे शक्य नाही यावर ज्योती ठाम होती. आपली मागणी पूर्ण होणे शक्य नाही हे सासरच्या लोकांना लक्षात आले. त्यामुळे कट रचून पती  निलेश म्हात्रे याने स्वयंपाक घरात ज्योतीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले. तिने पेट घेताच नवरा आणि सासूने कडी लाऊन पलायन केले. हा प्रकार  ६ डिसेंबर २०१५ ला घडला.यात ज्योतीचा १०० टक्के भाजून मृत्यू झाला.

हेही वाचा- नामफलक मराठीत नसल्यास आता कारवाई?; दुकानांवरील पाटय़ांबाबत अंमलबजावणीचा आज शेवटचा दिवस

याबाबत ज्योतीचे वडील हिरामण टावरी यांच्या तक्रारीवरुन पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पती तसेच इतरांविरोधात हत्या, छळवणूक आदी कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राख यांनी तपासाधिकारी म्हणून काम पहिले. आणि पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सात वर्षानंतर न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु झाली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील वाय. एस. गोपी यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले. त्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. डी. वडणे यांनी उपलब्ध साक्षी पुराव्यावरून आरोपी पती निलेश रामकृष्ण म्हात्रे, मालती रामकृष्ण म्हात्रे यांना दोषी ठरवून ज्योती हिचा अमानुष छळ आणि खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याशिवाय ६० हजार रुपये दंड ठोठावला.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या