'त्या' कर्तव्यदक्ष पोलीसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान |life was saved due to organ donation by a duty policeman at mgm hospital in kamothe | Loksatta

‘त्या’ कर्तव्यदक्ष पोलीसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

‘त्या’ कर्तव्यदक्ष पोलीसाच्या अवयवदानामुळे मिळाले दोघांना जीवदान

पनवेल: कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी ५८ वर्षांच्या व्यक्तीचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांना जीवनदान मिळाले तर दोघांना नवी दृष्टी मिळाली. या अवयवदानाच्या प्रत्यारोपन प्रक्रीयेमध्ये दोन किडन्या (मूत्रपिंड) आणि डोळे दान केले गेले. हे मुंबई शहरातील ४२ वे व रायगड जिल्ह्यातील दूस-यांदा होणारे अवयवदान असल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. एस.एन. कदम यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तींकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. करोना संसर्गानंतर अवयवदानाचे प्रमाण कमी झाले आहे. कामोठे एमजीेएम रुग्णालयात अवयव दानासाठी झालेली ही दूसरी शस्त्रक्रीया आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे राहणारे आणि पोलीस दलात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणारे गणपत आबाजी पिंगळे यांची प्रकृती 28 नोव्हेंबरला खालावली. त्यांना तातडीने दुपारी साडेतीन वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणण्यात आले. तोपर्यंत त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. वैद्यकीय उपचार पिंगळे यांच्यावर करण्यात आले.

हेही वाचा: नवी मुंबई: घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता

मात्र दोन दिवसांनी येथील डॉक्टरांनी पिंगळे यांचा मेंदूमृत झाल्याची माहिती पिंगळे कुटूंबातील सदस्यांना दिली. पिंगळे यांची पत्नी, मुलगा दोन मुली तसेच जावयांनी या वैद्यकीय स्थितीबद्दल इतर ठिकाणच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर पिंगळे हे नेहमी त्यांची प्रकृती ठणठणीत असताना कुटूंबातील प्रत्येकाला शरीरात शेवटपर्यंत प्राण असेपर्यंत अवयवदान नक्की करावे असा त्यांचा संकल्प बोलून दाखवत असल्याचे कुटूंबियांनी आठवण करुन दिली. अखेर पिंगळे यांच्या शरीरातील मूत्रपिंड व डोळे या अवयवाचे प्रत्यारपन करण्यासाठी सर्व वारसदारांची परवानगी मिळाली. जेटीसीसी समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लगेचच 1 डिसेंबरला दुपारी 12 वाजून तीन मिनीटांनी पिंगळे यांचे अवयव दान पुर्ण झाले.

हेही वाचा: एपीएमसी सभापतीसाठी रस्सीखेच सुरू; शिंदे गटाचे प्रभु पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

पिंगळे यांचे शव त्यांच्या कुटूंबाच्या ताब्यात देण्यापूर्वी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाच्या आवारात पिंगळे यांना रुग्णालयातील सूरक्षा विभागात काम करणा-या सेवानिवृत्त सैनिकांच्या एका तुकडीने मानवंदना देत सलामी दिली. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक कदम यांनी पिंगळे यांच्या वारसदारांना नेत्रदानाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्याची माहिती रुग्णालयाचे अवयव प्रत्यारोपन समन्वयक एकनाथ बागूल यांनी दिली. अखेर नागोठणे येथील पिंगळे यांचे पार्थिव घेऊन तेथे त्यांच्यावर अंत्यविधी पार पडला. कामोठे येथील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही सर्व प्रक्रीया पार पडल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे संचालक सेवानिवृत्त मेजर अॅण्ड जनरल के. आर. सलगोत्रा यांनी लोकसत्ताला दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 14:03 IST
Next Story
नवी मुंबई: घारापुरी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता