साहित्य पुरवठय़ावरून पेच; मारहाण केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थानिक शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. सिडको मंडळाने गणेशपुरी व तरघर येथील प्रकल्पबाधितांना उलवा परिसरात दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्यावर तेथे इमारत बांधकामासाठी ‘आम्हालाच पुरवठा करण्याची संधी द्या. अन्यथा विकासकाला तुडवू’ अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

नवी मुंबई पोलिसांनी या समस्येवर तोडगा काढावा यासाठी शेतकऱ्यांनी पोलीस उपायुक्त अशोक दुधे आणि सिडको मंडळाचे पुनर्वसन विभागाचे प्रमुख डॉ. संदीप माने यांची भेट घेऊन विनंती केली.

गणेशपुरी, तरघर, कोंबडभुजे या गावांमधील शेतकऱ्यांना सिडको मंडळाने विमानतळ प्रकल्पबाधित शेतकरी दर्जा देऊन त्यांना उलवे येथील जावळे गावाच्या हद्दीत भूखंड दिले आहेत. प्रत्येक लाभार्थीला वेगवेगळ्या आकाराचे भूखंड दिल्याने शेतकऱ्यांनी त्यावर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विकासकांशी भागीदारी केली आहे. उलवे येथे इमारत बांधण्यासाठी संबंधित लाभार्थी गेल्यावर तेथे जावळे गावातील काही शेतकऱ्यांनी ही आमची जमीन होती, त्यावर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी लागणारी वाळू, वीट व इतर बांधकाम साहित्याचा पुरवठय़ाचा ठेका आम्हालाच मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. याच भूमिकेमुळे प्रकल्पबाधित व स्थानिक शेतकरी असा वाद सुरू झाला आहे.

गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता उलवा पुष्पकनगर येथील सेक्टर २५ ए मधील भूखंड क्रमांक २९२ येथे आठ तरुणांनी जनककिशोर सिंग या विकासकाला मारहाण केली. जनककिशोर यांच्या गुप्तांगावर लाथा मारून तुडविण्यात आले. आमची जमीन गेली, बांधकाम पुरवठा न दिल्याचा राग ठेवून ही मारहाण करण्यात आली. यापूर्वीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात दमदाटी करण्याची नोंद झाली आहे.

जावळे गावच्या तरुणांनी जमीन सिडकोने संपादित केली असली तरी अद्याप त्यावरील बांधकाम साहित्याच्या पुरवठय़ावर दावा केल्याने होत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पनवेल शहर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिले आहेत. गुरुवारी सायंकाळी याबाबत पोलीस ठाण्यात जावळे गावच्या आठ तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढे कायद्याच्या आड येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे मत उपायुक्त दुधे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले आहे. गुरुवारी विकासकाला मारहाणीची तक्रार दाखल केल्यावर सुमारे अडीचशे विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन आपली भूमिका मांडली. जावळे गावचे स्थानिक गाववाले हे आमचेच आहेत, मात्र त्यांनी आम्हाला शत्रूप्रमाणे वागणूक देऊ नये. आम्ही त्यांच्याशी तडजोडीसाठी पुढाकार घेतला होता. अखेर गुरुवारी मारहाण झाल्यावर नाइलाजास्तव आम्हाला व विकासकाला पोलिसांत धाव घ्यावी लागली. आम्हाला आमच्याच बांधवांशी संघर्ष करायचे नसल्याचे बेलापूर येथील सिडको भवनमध्ये जमलेल्या शेतकऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम साहित्याचा पुरवठा कोणी करावा हा पोलिसांचा विषय असू शकत नाही. त्यात पोलिसांना रस नाही. मात्र कायदेशीर एखादे काम करत असताना त्या कामात इतरांनी बेकायदेशीर अडथळे निर्माण केल्यास आणि त्यावर तक्रारी पोलिसांना उपलब्ध झाल्यास पोलीस नक्कीच पुढाकाराने कारवाई करतील.

– अशोक दुधे, उपायुक्त, परिमंडळ २, नवी मुंबई पोलीस

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Locals banned from rehabilitation of airport project
First published on: 25-05-2019 at 00:52 IST