गणेश भक्तांना मुंबईतील गणरायाच्या दर्शनासाठी तसेच बेलापूर ते पनवेल ब्लॉक यादरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल- दादर आणि पनवेल ते बेलापूर मार्गावर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने (एनएमएमटीने) विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दररोज ५०% प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे त्या मार्गवर एनएमएमटीचे उत्पन्न देखील कमी झाले आहे. मुंबईमध्ये ही नामांकित तसेच आकर्षक देखावे पाहण्यासाठी विविध ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. पनवेल, नवी मुंबई ,ठाणे याठिकाणाहुन मुंबईत अधिका अधिक श्रीगणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात दिवसासह रात्रीही मुंबई गजबजलेली पाहायला मिळते. विशेषतः नोकदार वर्ग सर्व कामकाज आटपून रात्रीच्या वेळी गणरायाच्या दर्शनासाठी धाव घेत असतात. हेही वाचा >>> “माथाडी कायद्यात बदल आवश्यक”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन अगदी पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे राहिलेले दिसून येतात. या गणेशभक्तांना प्रवासासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातर्फे पनवेल ते दादर या मार्गावर २० ते २७ सप्टेंबरपर्यंत विशेष बससेवा चालू करण्यात आली आहे. दिवसा या मार्गावर उपक्रमाच्या १०३ क्रमांकाच्या बस नियमित धावतच असतात. त्याचबरोबर आता रात्री ते पहाटे पर्यंत ही विशेष बससेवा चालू केली आहे. यामध्ये पनवेलहून दादरला जाणारी पहिली बस ९.३० वाजता असून त्यानंतर दर अर्ध्या तासाने पहाटे २ वाजेपर्यंत सेवा उपलब्ध आहे. तसेच रात्री उशिरा येणाऱ्या उपनगरीय गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर रेल्वे स्थानक ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान ३२ विशेष बससेवा सुरू केल्या आहेत. या मार्गावर बस सेवा देण्यासाठी बसची कमतरता होती,मात्र केवळ प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गवर बससेवा सुरू केली होती. मात्र या दोन्ही मार्गवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असून अवघे ५०%प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे ज्याठिकाणी एक तिकीट कंडक्टरकडून ८ तासात ५-६ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित होते मात्र केवळ दीड ते दोन हजार रुपये उत्पन्न होत आहे. अशी माहिती परिवहन उपक्रमाचे मुख्य वाहतूक अधिकारी उमाकांत जंगले यांनी दिली आहे.