पनवेल तालुक्यात २४ पैकी १३ ग्रामपंचायतींवर दावा; ११ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात
पनवेल : पनवेल तालुक्यातील २४ ग्रामपंचायत निवडणुकीची सोमवारी मतमोजणी झाली असून यात १३ ग्रामपंचायतींवर शेकापसह महाविकास आघडीने दावा केला आहे. तर भाजपने ११ ग्रामपंचयती ताब्यात ठेवत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. या निकालामुळे भाजपपुढील आव्हाने वाढल्याचे चित्र आहे.
पनवेल तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार होत्या. मात्र खानावळे आणि आकुर्ली या गावांनी बिनविरोध सदस्य निवडून दिल्याने त्या बिनविरोध झाल्या. त्यामुळे २२ ग्रामपंचायतींमध्ये १८६ सदस्यांची निवड प्रक्रियेसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. याची मतमोजणी सोमवारी झाली. यात कोळखे, मोर्बे, सांगुर्ली, बारवई, नानोशी, साई, पालेबुद्रुक, हरिग्राम, आपटा, उसर्ली खुर्द, देवळोली, वलप या १२ ग्रामपंचायती महाविकास आघाडीची सत्ता आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर खानावळे ग्रामपंचायती बिनविरोध करीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला होता. तर उर्वरित ११ ग्रामपंचायतींवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामध्ये आकुर्ली ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. मतमोजणीत पालीदेवद, उमरोली, वाजे, खानाव, वारदोली, केवाळे, वाकडी, खैरवाडी, पोसरी व सावळे या दहा ग्रामपंचायतीत भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच भाजपने २४ ग्रामपंचायतींमधील २२८ सदस्यांपैकी सर्वाधिक १४४ सदस्य हे भाजपचे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायती जास्त जिंकल्या असल्यात तरी महाविकास आघाडीचे फक्त ८४ सदस्य निवडून आले आहेत.
तालुक्यातील साई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. हे गाव माजी आमदार विवेक पाटील यांचे असल्याने तेथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपने प्रयत्न केले होते. कर्नाळा बँक गैरव्यवहार हा प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र त्यांना यश आले नाही. ही ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात राहिली आहे.
भाग्यवंत उमेदवार
खानाव ग्रामपंचायतीत जयश्री शशिकांत दिसले या एका प्रभागातून निवडून आल्या तर दुसऱ्या प्रभागा समान मते पडली. त्यामुळे तेथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठी उडवून निर्णय घेण्याचे ठरविले. यात दिसले या विजयी झाल्या. तर पाली देवधर ग्रामपंचायतीत कविता पोपटा व ज्योती म्हात्रे यांना समान मते पडली होती. त्याठिकाणी कविता पोपटा या चिठ्ठीद्वारे विजयी झाल्या आहेत.
दोन ग्रामपंचायतींवर सत्ता संघर्ष
उरण मतदारसंघातील खानावले व देवळोली या दोन्ही ग्रामपंचायतींत भाजपचे उमेदवार कमी फरकाने विजयी झाल्यामुळे विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा दावा केला आहे. खानावले ग्रामपंचायतीवर नऊपैकी भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. येथे शेकापचे सर्वाधिक उमेदवार होते. तेथे महाविकास आघाडीतील शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे येथे भाजप- शिवसेना युती होईल का अशी साशंकता आहे. तर देवळोली येथे सात सदस्यांपैकी भाजपचे तीन सदस्य विजयी झाल्याने येथे शेकापसोबत भाजप युती करेल का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.